पाच वर्षीय बालकाचा खड्ड्यात पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

दवलामेटी (जि. नागपूर) : ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आर्यन नवदीप राऊत असे मृत बालकाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळी सहा पासून बेपत्ता होता. 

दवलामेटी रामजी नगर वस्तीमध्ये आटोचालक असलेले नवदीप राउत पत्नी सारिका, मृत आर्यन व इतर दोन मुलांसह राहतात. सोमवारी आर्यन सायंकाळी सहा वाजता त्याच्या घरच्यांना खेळाताना दिसला होता. रात्री आठ वाजेपर्यंत तो घरी परत न आल्याने त्याचा शोध सुरू झाला. दरम्यान सोमवार बाजाराचा दिवस असल्याने त्याला बाजारातही त्याचा शोध घेत सर्व परिचितांना विचारपूस करण्यात आली. रात्री 11 पर्यंत शोध घेतल्यावरही तो सापडला नसल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करीत वाडी पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी देखील याकडे गांर्भीयाने लक्ष दिले. मंगळवारी सकाळी पुन्हा आर्यनचा शोध घेण्यात आला. 

दवलामेटी येथील काही सामाजिक संघटना व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार, दहा दिवसांपूर्वी समाजभवनाच्या आवारात स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यासाठी खड्डा तयार केला आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी भरल्याने पुढील काम थांबले आहे. या खड्ड्यात आर्यनाच मृतदेह आढळून आला. वाडी पोलिसांना सूचना देण्यात आली. सरपंच-उपसरपंच शिर्डी येथे मेळाव्यासाठी गेल्याने ते या घटनेच्यावेळी हजर नव्हते. यामुळे या घटनेबद्दल नागरिकांत रोष आहे. 

आवारात पोहचला तरी कसा?
काही दिवसांपूर्वी एक बालक या खड्ड्यात पडला होता. आसपासच्या लोकांनी आरडाओरड करून त्याला बाहेर काढून वाचविले होते. आर्यनचा मृत्यूही बुडूनच झाला. मात्र, सुमारे 250 मीटर अंतरावर असलेल्या खड्ड्याजवळ आर्यन कसा पोहचला याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आर्यनचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीकडे योग्य मोबदल्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 years old boy die in pothole at Nagpur

टॅग्स