राष्ट्रसंतांच्या ५२व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात, दररोज होणार थेट प्रक्षेपण

प्रशिक मकेश्वर
Friday, 30 October 2020

मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाला यावर्षी सुरुवात झाली असून येत्या पाच नोव्हेंबरला दुपारी 4:58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाईल, तर यंदा या पुण्यतिथी महोत्सला गर्दी न करण्याचे आवाहन संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.

तिवसा (अमरावती): गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथी महोत्सवाला आज शुक्रवारी पहाटे प्रारंभ झाला. गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते तीर्थस्थापण, चरण पादुका पूजन व राष्ट्रसंताच्या समाधी अभिषेकाने सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी समाधीस्थळी मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये पहाटे साडेचार वाजता चरण पादुका पूजन कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाला यावर्षी सुरुवात झाली असून येत्या पाच नोव्हेंबरला दुपारी 4:58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाईल, तर यंदा या पुण्यतिथी महोत्सला गर्दी न करण्याचे आवाहन संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे. आज प्रार्थना मंदिराच्या परिसरात वाघ महाराज यांनी सामूहिक ध्यानाच्या महत्त्वावर चींतन प्रस्तुत केले. अष्टांग योगता, यंम, नियम, आसन, प्राणायाम सांगितले. परंतु, सर्वसाधारण माणसाला ध्यान ही कठीण बाब आहे, असे वाटते. मात्र, राष्ट्रसंतांनी ज्ञानाला सामुदायिक रूप प्राप्त करून साधनेचे सामुदायिकरण केले. ध्यानाला ध्यानातून माणसाचे मानवपण प्राप्त करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. सुंदर मनाशिवाय लक्ष प्राप्त होत नाही. साधनेचा उपयोग मनाचे शुद्धीकरण करण्यासाठी झाला पाहिजे. तोपर्यंत स्वधर्म साधला जात नाही, असे प्रकाश महाराज वाघ यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मण गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, डॉ. राजाराम बोथे, विलास साबळे, संजय तायडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - तोंडाला मास्क लाव गं सूनबाई, मग जा आपुल्या माहेरा!

तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी लाखो गुरुदेव भक्त उपस्थिती दर्शवतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी शर्तींमुळे हा पुण्यतिथी महोत्सव मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सकाळी तीर्थ स्थापना व सामुदायिक ध्यानाने पहाटे सुरुवात झाली असून आजपासून सुरू झालेल्या या महोत्सवात धार्मिक, सामाजिक आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाला होणारी गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथी महोत्सवाचे थेट प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप हा येत्या सात तारखेला महाप्रसादाने होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 th death anniversary program starts in gurukunj ashram mozari of amravati