मॅपलचे 5.5 कोटी आयकर विभागात जमा करा

मॅपलचे 5.5 कोटी  आयकर विभागात जमा करा
नागपूर : हवाला प्रकरणाच्या संशयातून मेसर्स मॅपल ज्वेलर्सकडून जप्त करण्यात आलेले सुमारे साडेपाच कोटी रुपये व्याजासह नंदनवन पोलिस ठाण्याने आयकर विभागाकडे जमा करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. विशेष म्हणजे रकमेवर दावा करणाऱ्या मॅपलच्या वतीने सुनावणीस कोणीही उपस्थित झाले नाही.
नंदनवन पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या टीपवरून उपरोक्त कारवाई केली होती. काही संशयास्पद हलाचालींमुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. कनिष्ठ न्यायालयाने मॅपल ज्वेलर्सला ही रक्कम परत देण्याचे आदेश देताना काही अटी टाकल्या होत्या. त्यात आयकर विभागाला बॅंक गॅरंटी द्यावी ही प्रमुख अट होती. याविरुद्ध उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला होता. मॅपल ज्वेलर्सच्या संपत्तीचे संपूर्ण मूल्यांकन होणे बाकी आहे आणि अशा वेळी रक्कम परत देणे योग्य ठरणार नसल्याने राज्य सरकारने उच्च न्यायालयास वेळ मागितला होता. मात्र, रकमेचा हिशेब पोलिसांना देण्यात मॅपल ज्वेलर्स असमर्थ ठरले. तसेच आज झालेल्या सुनावणीदरम्यान मेसर्स मॅपल ज्वेलर्सकडून कोणीही उपस्थित झाले नाही. त्यामुळे, ही रक्कम हवाला प्रकरणातीलच असल्याचे समजून उच्च न्यायालयाने नंदनवन पोलिसांना आयकर विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले. दरम्यान, नंदनवन पोलिसांनी ही संपूर्ण रक्कम मुदत ठेव खात्यात न ठेवता इतके दिवस स्वतःच्याच ताब्यात ठेवली. न्यायालयाने व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनाही फटका बसणार आहे. आयकर विभागाकडून ऍड. आनंद पुरचुरे यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हे आदेश दिले.
अशी जप्त केली रक्‍कम
नंदनवन पोलिसांना रायपूरवरून नागपूरला हवालाच्या पैशासह डस्टर कार (क्रमांक एमएच 31 एफए 4611) येत असल्याची सूचना मिळाली होती. त्यानुसार, 29 एप्रिल 2018 रोजी पोलिसांनी त्या कारला अडविले आणि कारची तपासणी केली. कारमध्ये राजेश मेंढे आणि नवजीवन जैन बसले होते. पक्की खबर असल्याने पोलिसांनी बारकाईने तपासणी केली. तेव्हा कारच्या खालच्या भागात एक लॉकर पोलिसांना आढळले होते. त्यातील रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली होती.
पोलिसांवरसुद्धा झाला होता आरोप
कारमध्ये एकूण 5 कोटी 70 लाख 89 हजार 889 रुपये होते. त्यापैकी फक्त 3 कोटी 18 लाख 7 हजार 200 रुपयांची जप्ती दाखविण्यात आली. तर, उर्वरित 2 कोटी 52 लाख 680 रुपये हडप केल्याचा आरोप मॅपल ज्वेलर्सने केला होता. त्यामुळे, या प्रकरणात एकूण तीन पोलिसांसह सात जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर, हडप केलेली उर्वरित रक्कम पोलिसांनी शोधून काढली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com