भीषण स्फोटात 6 ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

देवळी, पुलगाव (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या मुदतबाह्य स्फोटके निकामी करण्याच्या मैदानात स्फोटकांनी भरलेली पेटी पडल्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार, तर ११ जण जखमी झाले. यातील चार जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारूगोळा भांडार परिसरातील सोनेगाव (आबाजी) गावानजीकच्या मैदानात मंगळवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली. 

देवळी, पुलगाव (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या मुदतबाह्य स्फोटके निकामी करण्याच्या मैदानात स्फोटकांनी भरलेली पेटी पडल्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार, तर ११ जण जखमी झाले. यातील चार जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारूगोळा भांडार परिसरातील सोनेगाव (आबाजी) गावानजीकच्या मैदानात मंगळवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली. 

मृतांमध्ये नारायण शामराव पचारे (५५), विलास लक्ष्मणराव पचारे (४०), प्रभाकर रामदास वानखेडे (४०, रा. तिघेही सोनेगाव आबाजी), राजकुमार राहुल भोवते (२३), प्रवीण प्रकाशराव मुंजेवार (२५, दोघेही रा. केळापूर) आणि जबलपूर दारूगोळा भांडारातील तंत्रज्ञ उदयवीर सिंग (३८, रा. जबलपूर) यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये विकास शेषराव बेलसरे, संदीप शंकरराव पचारे, रूपराव श्रीराम नैताम, हनुमंत सराटे, नीलेश मून (सर्व रा. सोनेगाव आबाजी), दिलीप निमगडे, मनोज मोरे (रा. केळापूर), मनोज रामदास सयाम, प्रवीण श्रीरामे, प्रशांत हरिभाऊ मडावी, इस्माईल महम्मद शहा (रा. जामणी) यांचा समावेश आहे. जखमींपैकी प्रवीण श्रीरामे आणि दिलीप निमगडे यांना ओटीपोटात जखमा झाल्या आहेत. प्रशांत मुंजेवार आणि मनोज मोरे यांना छातीत दुखापत व फ्रॅक्‍चर आहे. 

सोनेगाव (आबाजी) या गावाजवळ दारूगोळा नष्ट करण्याचे मैदान (क्षेत्र) आहे. देवळी व सोनेगाव मौजा क्षेत्रात हा परिसर येतो. येथे मुदत संपलेले बाँब व दारूगोळा नियमितपणे नष्ट केला जातो. सध्या जबलपूर दारूगोळा भांडारातील विविध प्रकारचे मुदत संपलेले बाँब व दारूगोळा नष्ट करण्याकरिता येथे आणण्यात येत आहेत. मंगळवारी सकाळी बाँब  नष्ट करण्याचे काम सुरू होते. जबलपूर येथून ट्रकद्वारे आणलेल्या दारूगोळ्याच्या पेट्या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये नेऊन ठेवल्या जात असताना एक पेटी पडली व त्यातील दारूगोळ्याचा स्फोट झाला. यात विलास पचारे, नारायण पचारे, प्रवीण मुंजेवार आणि उदयवीर सिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रभाकर वानखेडे आणि राजकुमार भोवते यांचा सावंगी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. 

दारूगोळा भांडारातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी ट्रकमधून बॉम्बच्या पेट्या काढणे, खड्यांमध्ये पोचविणे व बॉम्ब नष्ट करणे ही प्रक्रिया पार पाडायची असते; मात्र ही सर्व कामे अप्रशिक्षित मजुरांकडून करून घेतली जातात. स्फोटानंतर तांबे, पितळ आणि लोखंड गोळा करण्यासाठी हे मजूर येत असतात; परंतु त्यांच्याकडून हे जोखमीचे काम करून घेण्यात येत असल्यामुळे ही घटना घडल्याचे कळते.

पुन्हा मंगळवारच
केंद्रीय दारूगोळा भांडारात यापूर्वी ३१ मे २०१६ रोजी भीषण स्फोट होऊन अग्नितांडवात १६ अधिकारी व जवान मृत्युमुखी पडले होते. हा दिवस मंगळवारच होता. दुसरी घटनाही मंगळवारीच (ता. २०) घडली आहे. या घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला. स्फोटांच्या घटनांतील मंगळवार कर्दनकाळ ठरला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांचे साह्य 
मुंबई - वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले असून, या स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करावी व समितीने एका महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

Web Title: 6 death in blast