esakal | रुग्णांकडून अतिरिक्त बील आकारणे भोवले; यवतमाळच्या सहा कोविड रुग्णालयांना नोटीस

बोलून बातमी शोधा

रुग्णांकडून अतिरिक्त बील आकारणे भोवले; यवतमाळच्या सहा कोविड रुग्णालयांना नोटीस
रुग्णांकडून अतिरिक्त बील आकारणे भोवले; यवतमाळच्या सहा कोविड रुग्णालयांना नोटीस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांत ऑडिटर नियुक्त केले आहे. या ऑडिटरांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार यवतमाळ शहरातील सहा खासगी कोविड रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: गावखेड्यात मास्कविनाच जनतेचा वावर; कोरोनाच्या संसर्गाने घेरले; काणाडोळा ठरतोय घातक

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात 24 खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरिता निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

रुग्णालयात नियुक्त केलेल्या ऑडिटर यांनी बिलाच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार अतिरिक्त बील आकारल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या स्वाक्षरीने सहा खासगी कोविड हॉस्पिटलला नोटीस देण्यात आली आहे. या हॉस्पिटलला नोटीस मिळाल्यापासून 48 तासांत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयांचे उत्तर समाधानकारक नसल्यास वसुलीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

खासगी कोविड रुग्णालयांत प्रशासनाने नेमलेल्या ऑडिटरमार्फत दैनंदिन दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती घेणे, रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या, ऍक्‍टिव्ह रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्ण, सुटी देण्यात आलेले रुग्ण यांची अद्ययावत माहिती ठेवणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून शुक्‍ल आकारणी होते किंवा नाही, याची पडताळणी करणे, परिपत्रकानुसार शुल्क आकारणी होत नसल्यास एकंदरीत बिलाची तपासणी करून शुल्क आकारणी निश्‍चित करणे, रुग्णालयातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णांचे देयके तपासल्याशिवाय त्यांना सुटी होणार नाही, याची खात्री करणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तेथेच त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे, याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सादर करणे आदी कार्यवाही करण्यात येते.

हेही वाचा: सुपारी किलर रणजित सफेलकरच्या ‘राजमहाल’वर चालणार बुलडोजर; पोलिस विभाग ॲक्शन मोडमध्ये

यांचा समावेश

जादा बिल आकारल्याप्रकरणी सहा कोविड हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात धवणे हॉस्पिटल, यवतमाळ कोविड केअर सेंटर, उजवणे हॉस्पिटल, क्रिटिकेअर हॉस्पिटल, राठोड इन्टेंसिव्ह केअर युनिट व महालक्ष्मी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ