esakal | गावखेड्यात मास्कविनाच जनतेचा वावर; कोरोनाच्या संसर्गाने घेरले; काणाडोळा ठरतोय घातक

बोलून बातमी शोधा

null

गावखेड्यात मास्कविनाच जनतेचा वावर; कोरोनाच्या संसर्गाने घेरले; काणाडोळा ठरतोय घातक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना ग्रामीण भागातील नागरिकांनी उपाययोजना केल्या. त्यामुळे गावाच्या शिवेबाहेरच कोरोनाला रोखण्यात यश आले. दुसऱ्या लाटेत मात्र, गावखेड्यातील जनता मास्कविनाच घराबाहेर पडत आहे. त्यांचा हाच बिनधास्त वावर धोकादायक ठरत आहे.

हेही वाचा: यवतमाळकरांनो, जिल्ह्यात २५ दिवसांत पंधरा हजार जणांची कोरोनावर मात; भीती नको काळजी घ्या

कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या शहरी भागात निघत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आता ग्रामीण भागात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाचशे लोकवस्तीच्या गावात शंभर बाधित निघत आहेत. "आम्हाला कसला होतोय कोरोना, कोरोना बिरोना काहीच नाही', असा सूर आवळणाऱ्या गावातील जनतेला दुसऱ्या लाटेत चांगलाच धक्का बसला आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनच्या काळात गावखेड्यात सर्वांनीच पुढाकार घेत गावबंदी केली.

अनोळखी सोडाच ओळखीच्या व्यक्तीलाही गावात प्रवेश देण्यात आला नाही. आरोग्य विभागाच्या पथकाला माघारी पाठवत असताना गावात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच नागरिक बिनधास्त झाले. ग्रामीण भागात विवाह, साक्षगंध या समारंभात चिंताजनक गर्दी झाली. निवडणुकीत कोणत्याही प्रकारची सुरक्षा पाळल्याचे दिसले नाही.

अनेकांनी मास्क केवळ शोभेपुरताच वापरण्याला प्राधान्य दिले. कामानिमित्त बाहेर गेल्यास दंडात्मक कारवाईच्या भीतीने मास्क लावण्यात येत होता. जिल्ह्यात शेकडो गावात बाधितांची संख्या निघत असतानाही गावखेड्यातील नागरिक तितक्‍या गांभीर्याने मास्क वापरताना दिसत नाहीत. मिळेल तेथे बसून गप्पाचा फड रंगविला जात आहे. नागरिकांचा घोळका एकत्र असताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. हाच कानाडोळा ग्रामीण भागासाठी घातक ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी गेल्या वर्षी जी काळजी घेतली. ती आता घेतल्यास संसर्गाला आळा बसेल, असे मत सुज्ञव्यक्ती व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा: नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

चोरट्या मार्गाने प्रवास

कडक निर्बंध असल्याने वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. मुख्य मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त राहत असल्याने चोरट्या मार्गाचा प्रवासासाठी वापर केला जात आहे. खासगी वाहनात अक्षरशः: कोंबून नागरिक प्रवास करतात. सामाजिक अंतराचा पुरता बट्ट्याबोळ तर उडतोच, शिवाय प्रवासादरम्यान कुणीही मास्क वापरत नाही. हे धक्कादायक चित्र मंगळवारी (ता.27) सकाळी नऊच्या दरम्यान जांब रोडवर दिसले. वाहनातील गर्दी बघून अनेकांनी प्रवासाबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.

संपादन - अथर्व महांकाळ