पंतप्रधान कृषी योजनेच्या मानधनासाठी लहान भावानेच केला खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

- सन्मान योजना मानधनाच्या वादातून मोठ्या भावाला दगडाने ठेचले 
- कळमेश्‍वर तालुक्‍यातील तेलकामठी येथील घटना 

सावनेर (नागपूर) : मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील मानधन कुणाला मिळावे यावरून दोन भावांतील वाद विकोपाला गेला. यामध्ये लहान भावाने मोठ्याचा दगडाने ठेचून खून केला.

कळमेश्‍वर तालुक्‍यातील तेलकामठी येथे शनिवारी ही घटना घडली. रमेश संतोष वाडीकर (वय 48, रा. तेलकामठी) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलकामठी येथील रमेश व त्यांच्या लहान भाऊ गणेश यांची चार एकर शेती आहे. दोघांमध्ये वाटणी झाली आहे. मात्र, सातबारावर मोठ्या भावाचे नाव आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येत आहे. यासाठी रमेश आणि गणेश यांनी बॅंक खात्याची माहिती व सातबारा ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी जमा केला. मात्र, जमीन नावाने असल्याने रमेश यांनाच त्याचा लाभ मिळणार होता. यावरून दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात दोघांत वाद झाला. यानंतर दोघेही निघून गेले. 

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गणेश मोठा भाऊ रमेश यांच्या शेतीत गेला. त्यावेळी रमेश तुरी काढत होता. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात गणेशने रमेश यांच्या डोक्‍यात दगड घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहास शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी आरोपी गणेश संतोष वाढीकर याला अटक केली आहे. 

लाभ देण्याचा प्रयत्न 
या दुर्दैवी घटनेनंतर तेलकामठी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य तसेच विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी गावात भेट दिली. कुटुंबीयांचे सांत्वन करताना योजनेचा लाभ दोन्ही कुटुंबांना मिळावा यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.

Web Title: 6000 rupees for a farm scheme small brother has killed a big brother at nagpur