64 महाविद्यालयांचे प्रवेश गोठविणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

'एलईसी'साठी दहा महाविद्यालयांचा होकार

'एलईसी'साठी दहा महाविद्यालयांचा होकार
नागपूर - विद्यार्थिसंख्या घटल्याने अनेक महाविद्यालयावर बंद करण्याची नामुष्की ओढविली. यातूनच 122 महाविद्यालयांनी गेल्या सहा वर्षांपासून संलग्निकरणासाठी अर्जच केले नाही. 74 महाविद्यालयांनी अर्ज केल्यावर स्थानिक चौकशी समितीद्वारे (एलईसी) तपासणी करून घेण्यास नकार दर्शविली. त्यांना विद्यापीठाने प्रवेश गोठविण्याचा "अल्टिमेटम' दिल्यावर केवळ दहाच महाविद्यालयांनी समितीला होकार दिला. त्यामुळे 64 महाविद्यालयांचे प्रवेश गोठविण्यात येतील.

बीसीए, बीसीएस, बीसीसीए आणि इतर तांत्रिक अभ्यासक्रमांची मागणी वाढल्याने आठ वर्षांपूर्वी विद्यापीठात नव्या महाविद्यालयांचे पीक आले. त्यामुळे महाविद्यालयांची संख्या साडेसातशेहून अधिक झाली. कालांतराने या अभ्यासक्रमांना गळती लागल्याने बऱ्याच पटसंख्या घटली. यापूर्वीच अडीचशे महाविद्यालयातील बोगस प्रवेशाचे प्रकरण समोर आल्यावर ही बाब चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर त्यापैकी साठहून अधिक महाविद्यालये बंद झाली. याशिवाय अभियांत्रिकी आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनीही काही शाखा बंद करण्याची मागणी केली.

प्रत्येक महाविद्यालयाकडून दरवर्षी संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यावर्षी 122 महाविद्यालयांनी संलग्निकरणासाठी अर्जच केलेला नाही. त्यामुळे ही महाविद्यालये निश्‍चित बंद होणार दुसरीकडे संलग्निकरण केलेल्या 74 महाविद्यालयांची तपासणी स्थानिक चौकशी समिती (लोकल इन्क्वायरी कमेटी) लावून घेणे आवश्‍यक असते. मात्र, ती लावून न घेतल्याने प्र-कुलगुरूंनी 15 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. त्याला केवळ दहा महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला. आता 18 तारखेपासून उर्वरित 64 महाविद्यालयांचे प्रवेश गोठविण्याचे आदेश प्र-कुलगुरूंनी दिलेत.

अभियांत्रिकी, बीएड महाविद्यालयांवरही गाज
एकीकडे विद्यापीठातून 180पेक्षा अधिक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर असताना, दुसरीकडे नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने (एनसीटीई) बीएड आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी महाविद्यालयांबद्दल बरेच कठोर नियम लावण्यास सुरुवात केल्याने येत्या वर्षभरात या दोन्ही अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांवर बंद करण्याची नामुष्की ओढवू शकते. त्यामुळे विद्यापीठातील महाविद्यालयांची संख्या बरीच कमी होणार आहे.

Web Title: 64 college admission stop