मुंडीकोट्यात एकाच रात्री 7 चोऱ्या

file photo
file photo

मुंडीकोटा (जि. गोंदिया) ः येथील सात दुकानांत चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 21) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. उमेश विद्याधर धुर्वे (वय 27), शक्‍ती नारायण चाचेरे (वय 30, दोघेही रा. खडकी पालोरा) अशी चोरट्यांची नावे आहेत. या घटनेत आणखी काही चोरटे सहभागी असल्याचा संशय आहे. चोरट्यांनी एपीएम बार येथील मागील बाजूच्या तटरक्षक भिंतीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दारूच्या बाटल्यांसह सिगारेटचे पॉकेट व नगदी 3 हजार 145 रुपये, सीसीटीव्ही, डीव्हीआर असा एकूण 22 हजार 385 रुपयांचा माल चोरून नेला. याच चोरट्यांनी हरडे क्‍लॉथ सेंटर, श्रीराम क्‍लॉथ सेंटर, प्रकाश आयडिया मोबाईल शॉपी, भरणे ज्वेलर्स, कामधेनू किराणा स्टोअर्स, देशी बिअर शॉपी अशा एकूण सात दुकानात चोरी केली. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेने दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी उमेश धुर्वे व शक्‍ती चाचेरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील हिरोहोंडा कंपनीची दुचाकीदेखील जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिवाकर शहारे व गोंडाणे करीत आहेत.
असे सापडले चोर
बाजार चौक येथील रहिवासी भास्कर क्षीरसागर हे झोपेत असताना त्यांना कशाचा तरी आवाज येत असल्याचा भास झाला. त्यामुळे ते घराबाहेर निघाले. त्यांना एक अनोळखी व्यक्‍ती संशयास्पद दिसला. त्यामुळे त्यांनी रामकुमार जायस्वाल यांना भ्रमणध्वनी करून घटनास्थळी बोलावले. दरम्यान, चोरी होत असल्याचे समजताच रामकुमार जायस्वाल यांनी व्यापाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. भास्कर क्षीरसागर यांनी मुंडीकोटा पोलिस चौकीला माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. या वेळी चोरटे भरणे ज्वेलर्स येथे शिरले असल्याचे समजल्यावर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. दरम्यान, नागरिक आपल्याकडे येत आहेत, ते आपल्याला पकडतील, मारहाण करतील, या भीतीने चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेले चिल्लर पैसे व विटा नागरिकांच्या दिशेने भिरकावण्यास सुरवात केली. तोपर्यंत गावकरी जागे झाले होते. त्यानंतर मोठ्या शिताफीने दोन चोरट्यांना ज्वेलर्स दुकानाच्या बाहेर काढण्यात आले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com