दिवसाला 80 टायरचे होते नूतनीकरण 

भूषण काळे 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नूतनीकरण करण्यात आलेला टायर हा इलेक्‍ट्रीक बिल, यंत्राचे मेटन्संस, कर्मचाऱ्यांचे वेतन असे पकडून 2 हजार 700 रुपयांत बनतो. शिवशाहीत सध्या ट्यूबलेस रेडियल टायरचा वापर केला जात आहे. 

अमरावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्यात नऊ रिट्रीड प्लांट (टायर नूतनीकरण संयत्र) कार्यरत आहेत. यापैकी एक रिट्रीड प्लांट अमरावती येथे मागील 20 वर्षांपासून कार्यरत आहे. शहरातील या रिट्रीड प्लांटमध्ये दरदिवसाला 60 ते 70 टायरचे नूतनीकरण केले जाते. सोमवारचा दिवस वगळता उर्वरित दिवशी तीन शिफ्टमध्ये 24 तास हा रिट्रीड प्लांट सातत्याने सुरू राहतो. प्रत्येक महिन्याला याठिकाणी 1800 ते 2000 टायरचे नूतनीकरण केले जाते. 

शहरातील या रिट्रीड प्लांटमध्ये नूतनीकरण करण्यात आलेल्या नवीन टायरचा पुरवठा हा अकोला, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती व जालना याठिकाणी करण्यात येतो. प्रत्येक विभागाचे टार्गेट ठरलेले असून त्यानुसार त्या विभागाला तसा पुरवठा केला जातो. प्रत्येक विभागाला महिन्याकाठी 350 ते 400 रिट्रीड टायरचा पुरवठा केला जातो. यानंतर प्रत्येक विभाग हा आगारनिहाय रिट्रीड टायरचा पुरवठा करते. 

महिन्याला 250 नवीन टायर
अमरावती विभागाला प्रत्येक महिन्याला 250 नवीन टायर येतात. हे टायर एसटीच्या समोरील बाजूस वापरले जातात. नवीन टायरने 50 ते 70 हजार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर त्याचे नूतनीकरण केले जाते. नूतनीकरण केलेल्या टायरचा वापर पुन्हा मागील बाजूस केला जातो. अपघात टाळण्यासाठी रिट्रीड टायर हे मागच्या बाजूस वापरण्यात येतात. मात्र शॉर्ट रुट आणि रस्ता चांगल्या असल्यास हे टायर समोरील बाजूसही वापरले जातात. परंतु महामंडळाकडून सहसा ते टाळल्या जाते. 

रिट्रीड टायरचा वापर मागील बाजूस 

50 ते 60 हजार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर टायरवर प्रक्रिया करून त्याचे नूतनीकरण केले जाते. टीडब्ल्यूआय (ट्रेड विअर इंडिकेटर) तथा केसिंग योग्यवेळेस तपासून पाहल्यास एका टायरवर तीन ते चार वेळा प्रक्रिया करून त्याचे नूतनीकरण केले जाते. टायरची नूतनीकरणाची मर्यादा संपल्यानंतर हे टायर स्क्रॅपमध्ये काढले जातात. विशेष म्हणजे, टायरच्या चुराची वीट्टभट्टी विक्रेत्यांना विकला जातो. याठिकाणी एकही वस्तू व्यर्थ जात नसल्याचे तेथे कार्यरत अधिकाऱ्यांनी सांगितले. 

2600 रुपयांत बनतो टायर 

रेडियल आणि नायलॉन असे दोन टायरचे प्रकार आहे. नायलॉन टायरच्या तुलनेत रेडियल टायर हे अधिक मायलेज देतात. मायलेजसोबतच या टायरची किंमतही अधिक आहे. रेडियल टायर हा 14 ते 15 हजार तर नायलॉनचा टायर हा 10 ते 11 हजार रुपयांपर्यंत मिळतो. महामंडळात रेडियल टायरचा वापर अधिक आहे. या टायरवर नायलॉन टायरच्या तुलनेत नूतनीकरणाचे प्रमाण कमी आहे. नूतनीकरण करण्यात आलेला टायर हा इलेक्‍ट्रीक बिल, यंत्राचे मेटन्संस, कर्मचाऱ्यांचे वेतन असे पकडून 2 हजार 700 रुपयांत बनतो. शिवशाहीत सध्या ट्यूबलेस रेडियल टायरचा वापर केला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 tires a day were renewed