Vidhan Sabha 2019 : 85 मतदान केंद्रांच्या स्थळात बदल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नागपूर : मतदारांची गर्दी व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघातील 85 मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. 

नागपूर : मतदारांची गर्दी व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघातील 85 मतदान केंद्रांच्या स्थळांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. 
जिल्ह्यात सर्वाधिक कामठीतील 27 मतदान केंद्रांच्या इमारतीत बदल करण्यात आला आहे. त्यानंतर रामटेक, नागपूर उत्तरमधील प्रत्येकी 13, नागपूर पूर्वमधील 10, नागपूर दक्षिण 9, नागपूर दक्षिण-पश्‍चिम 5, सावनेर 3 आणि उमरेडमधील 2 मतदान केंद्रांच्या इमारतीत बदल केला आहे. यासंबंधीची माहिती मतदान केंद्रातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. जुन्या इमारत स्थळी नवीन ठिकाणच्या नावाची माहिती लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लाउडस्पीकरच्या माध्यमातूनही संबंधित क्षेत्रातील मतदारांना बदलाची माहिती देण्यात येईल. व्होटर स्लिपद्वारेही माहिती पोहोचवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. इमारती व्यवस्थित नसल्याने किंवा मतदारांना मतदानासाठी अडचण येत असल्याने या केंद्राच्या इमारती बदलल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकोश ओला, विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त श्‍वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते. 
तयारी पूर्ण 
मतदानासाठी आवश्‍यक तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीसाठी एकूण 17 हजारांवर निवडणूक कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांचे दोन टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण झाले असून, तिसरे प्रशिक्षण रविवारी होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल 89 टक्के मतदारांपर्यंत व्होटरस्लिप पोहोचलेल्या आहेत. केंद्रांवर मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंध, अपंग दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरसह विशेष व्यवस्था केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
1,445 कर्मचाऱ्यांचे अर्ज रद्द 
निवडणुकीच्या कामात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 17,143 कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केले. यातील 538 कर्मचाऱ्यांची मतदानाच्या व्यवस्थेचा फायदा घेतला. उर्वरित 15,046 कर्मचाऱ्यांचे बॅलेट पोस्टलच्या माध्यमातून घरी पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत 114 कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट प्राप्त झाले आहे. अपूर्ण माहिती भरल्याने 1,445 कर्मचाऱ्यांचे अर्ज रद्द झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 85 Change of polling stations