esakal | नात्यांमधील वीण घट्ट : पाच पिढ्यांच्या लेकींचा अनोखा संगम
sakal

बोलून बातमी शोधा

पाच पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वानखडे ते ठोंबरे कुटुंबातील स्त्रिया.

नात्यांमधील वीण घट्ट : पाच पिढ्यांच्या लेकींचा अनोखा संगम

sakal_logo
By
गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : हल्लीचे युग इंटरनेटचे... प्रत्येकाच्या हातात मोबाईल... स्क्रीनवरून नजर जरादेखील हटत नाही... आपल्याच जिवलगांकडे बघण्याची फुरसत नाही... इंटरनेटच्या या आभासी मायाजालात जगणेच विसरलो आहे... पणजी-पणजोबा, आजी-आजोबा, आई-बाबा या नात्यांची वीण इंटरनेटने सैल केली आहे. मात्र, आजही काही कुटुंबे नाते घट्ट टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सणासुदीच्या निमित्ताने का होईना तालुक्यातील कारखेड येथे चार कुटुंबातील पाच पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र येऊन नात्यांमधील वीण घट्ट करण्याचा केलेला प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. (A-unique-confluence-of-five-generations-in-Yavatmal)

नाते कोणतेही असो त्यात प्रेम व जिव्हाळा असतोच. पिढ्यांपिढ्यांची नाती जपणारी माणसे आजही पाहायला मिळतात. त्यात पाच पिढ्यांच्या लेकींच्या एकत्र भेटीचा योग दुर्मिळच! नेर तालुक्यातील कारखेडा येथे गोविंदराव वानखडे यांचे कुटुंब राहते. गोविंदराव यांचे पुत्र गुलाबराव वानखडे हे धार्मिक वृत्तीचे सद्गृहस्थ होते. त्यांच्या सुविद्य पत्नी नर्मदा आजही वानखडे कुटुंबाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नुकतेच या कुटुंबातील खापरपणजी व नातीच्या झालेल्या अविस्मरणीय भेटीने जुन्या नात्यांना उजाळा मिळाला. यावेळी चार पिढ्या एकत्र आल्या होत्या.

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

वयोवृद्ध खापरपणजी श्रीमती नर्मदा गुलाबराव वानखडे (कारखेड, ता. नेर), पणजी सौ. अनसूया आरेकर (महागाव कसबा, ता. दारव्हा), आजी सौ. सुनंदा गिऱ्हे (हिवरखेड, ता. तेल्हारा) आई सौ. मंजिरी ठोंबरे (रा. मोर्शी) यांच्यासह पाचव्या पिढीची प्रतिनिधी चिमुकली मनस्वी ठोंबरे हिनेदेखील हा सुखद भेटीचा क्षण अनुभवला. चारही कुटुंबांसाठी हा औत्सुक्याचा विषय होता. त्या पाच जणी आपल्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करीत एकत्र आल्या तेव्हा आनंदाला उधाण आले.

तब्बल पाच पिढ्यांमधील अंतर खूप मोठे आहे. प्रत्येक पिढीचा काळ वेगवेगळा आहे. त्या काळातील राहणीमान, उपलब्ध सोयी सुविधा, संस्कृती यात मोठे बदल झाले आहे. जेव्हा या पाचही पिढ्यांमधील सर्व जणी एकत्र आल्या तेव्हा त्या आठवणींमध्ये रमून गेल्या होत्या. गप्पांची मैफल रंगली. खापरपंजीकडून चारोळ्या तर चिमुकल्या नातीकडून गाण्यांची जुगलबंदी कुटुंबाला अनुभवता आली. हे पाहुणपणाची भेट त्या पाच पिढ्यांच्या संगमामुळे नात्यांमधील वीण घट्ट करणारी ठरली.

हेही वाचा: नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

कुटुंबीयांसोबत राहा!

मोबाईलने क्रांती केली खरी पण चार भिंतीतच दुरावाही निर्माण केला आहे. नात्यातील ओलावा कमी होत आहे. एकाच कुटुंबातील आई, बाबा व मुले मोबाइलमध्ये इतके व्यस्त असतात की, त्यांना एकमेकांशी संवाद साधायला वेळ नाही. कमालीचा भावनिक दुरावा निर्माण झाला आहे. इंटरनेटच्या आभासी जगात न राहता कुटुंबीयांसोबत राहण्याचे आवाहन मंजिरी ठोंबरे यांनी केले.

(A-unique-confluence-of-five-generations-in-Yavatmal)

loading image