आमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

अकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार प्रसिद्ध अभिनेता आमीर खान व किरण राव यांनी जिल्ह्यातील खंडाळा गावाला भेट दिली. या वेळी ग्रामस्थांसोबत श्रमदान करून पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी फाउंडेशनच्या उत्साही कार्यकर्त्या मेहमुनाबी यांनी "आते क्‍या खंडाळा...' म्हणत खंडाळा गावाला भेट देण्याची केलेली मागणी आज आमीर खान यांनी पूर्ण केली. बुलडाणा जिल्ह्यातील सालवन येथील आदिवासी तांड्यालाही आमीर खान यांनी भेट दिली.

भूजलपातळी झपाट्याने खोल जात असल्याने निर्माण होत असलेल्या जलसंकटावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशन "सत्यमेव जयते वॉटप कप' स्पर्धेअंतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या स्पर्धेत सहभागी खंडाळा गावात ग्रामपंचायत सदस्या मेहमुनाबी यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहन देत जलसंधारणाची कामे केली आहेत. गावात झालेल्या कामाची माहिती देण्यासाठी मेहमुनाबी यांनी थेट आमीर खान यांच्याशी संपर्क केला आणि गावात केलेली कामे पाहण्यासाठी "आते क्‍या खंडाळा...' अशी विनंती केली. त्यावर "आउंगा मैं खंडाळा...' म्हणत आमीर खान यांनी खंडाळा गावाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते.

आमीर खान, किरण राव यांचे हेलिकॉप्टरने आज सकाळीच तेल्हारा येथे आगमन झाले. या वेळी त्यांनी खंडाळा गावाला भेट देऊन जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. त्यानंतर आमीर खान, किरण राव यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सालवन येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी करून श्रमदान केले. आदिवासी तांड्यावर आलेल्या आमीर खान यांचे आदिवासी संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या वेळी आमीरला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

फोटो 79637

Web Title: aamir khan water foundation Water conservation work