लाच मागितल्याप्रकरणी पोलिस शिपाई 'एसीबी'च्या जाळ्यात

सूरज पाटील
Monday, 28 September 2020

काही दिवसांपूर्वी बोरी खुर्द येथे शहर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. प्रशांत स्थुल बोरी बीटचा प्रभारी असून त्यामध्ये आरोपी असलेल्या एका व्यक्तीस जुगार प्रकरणातून वगळण्यासाठी पोलिस शिपाई प्रशांत स्थुल याने पैशाची मागणी केली.

पुसद (जि. यवतमाळ)  : पुसद शहर पोलिस स्टेशनचा पोलिस शिपाई प्रशांत विजय स्थुल (रा. श्रीरामपूर) यास जुगाराच्या प्रकरणातून फिर्यादीला वगळण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी बोरी खुर्द येथे शहर पोलिसांनी जुगारावर धाड टाकली. प्रशांत स्थुल बोरी बीटचा प्रभारी असून त्यामध्ये आरोपी असलेल्या एका व्यक्तीस जुगार प्रकरणातून वगळण्यासाठी पोलिस शिपाई प्रशांत स्थुल याने पैशाची मागणी केली. काही रक्कम दिल्यानंतर पोलिस शिपायाने पुन्हा त्याच्यामागे पैशासाठी तगादा लावला. शेवटी त्याने कंटाळून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. 

मन सुन्न! चुली पेटल्याचं नाहीत; गावातील मुलांच्या बाबतीत घडलेली हृदयद्रावक घटना बघून हळहळले अख्खे गाव
 

त्यानुसार लाचखोर पोलिसाला रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी व चमूने सोमवारी सापळा रचला. त्यानुसार  पोलिस शिपायाला फिर्यादीने तहसील कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये चर्चेसाठी बोलावून घेतले. पडताळणीत पोलिस शिपायाने फिर्यादीकडून तडजोडीनंतर केलेली १५०० रुपयांच्या लाचेची मागणी मान्य केली. दरम्यान, पोलिस शिपायाला सुगावा लागल्याने त्याने नियोजित रक्कम स्वीकारली नाही. 

हे लक्षात येताच  लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिस शिपाई प्रशांत स्थुल यास लगेच ताब्यात घेतले.  त्याने फिर्यादीकडून लाच मागणी केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. या कारवाईत एसीबीचे पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, पोलिस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, कर्मचारी ज्ञानेश्वर शेंडे, अनिल राजकुमार, महेश वाकोडे, वसीम शेख, राकेश सावसाकडे, राहुल गेडाम यांनी सहभाग घेतला.
 
तक्रार देणारा शिपाईच जाळ्यात

बोरी खुर्द येथील जुगारावरील धाड प्रकरणी आरोपी गजानन कुकडे याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जुगार प्रकरणातून नाव मागे घेण्यासाठी पोलीस शिपाई प्रशांत स्थुल याने लाच मागितल्याची तक्रार यातील आरोपीने 'एसीबी' कडे केली होती. दरम्यान प्रशांत स्थुल याने गजानन कुकडे यांनी एसीबी कडील तक्रार मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली . त्यावरून पोलिसांनी कुकडे विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. 'चक्क पोलिसालाच मागितली खंडणी' या आशयच्या बातम्याही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या. परंतु, त्याच प्रकरणातील पोलिस शिपाई प्रशांत स्थुल सोमवारी लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकला.
 

एसीबी ट्रॅप होतात फेल ?

पोलिस शिपाई लाच प्रकरणात ऐनवेळी संशय आल्याने पोलिसाने लाच स्वीकारली नाही. त्यामुळे 'एसीबी'ला आरोपीस रंगेहात पकडता आले नाही. लाचेची मागणी आरोपीने कबूल केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच काही दिवसांपूर्वी वसंतनगर येथील पोलिस शिपायाविरुद्ध पाचशे रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली. परंतु, 'एसीबी'चा ट्रॅप यशस्वी होऊ शकला नाही. याचा अर्थ गोपनीय माहिती कुठेतरी झिरपते का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादन  : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB action against police constable for soliciting bribe