राखी खरेदी करताना चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

खापरखेडा - येथील बाजारात राखी खरेदी करीत असताना सुनीता सुरेश गेडाम (वय ४०, रा. वाघोडा, ता. पारशिवनी) यांना भरधाव ट्रकने चिरडले. यात सुनीता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. 

खापरखेडा - येथील बाजारात राखी खरेदी करीत असताना सुनीता सुरेश गेडाम (वय ४०, रा. वाघोडा, ता. पारशिवनी) यांना भरधाव ट्रकने चिरडले. यात सुनीता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. 

सुनीता पती सुरेश व मुलगी कल्याणीसह दुचाकीने भावाला राखी बांधण्यासाठी दहेगाव रंगारी येथे जात होत्या. दरम्यान, रक्षाबंधनासाठी खापरखेडा येथील मुख्य बाजारात त्या साहित्य खरेदी करीत होत्या. पती व मुलगी बाजूला उभे होते. काही कळायच्या आत भरधाव आलेल्या कोळशाच्या  दहाचाकी ट्रकने सुनीता यांना चिरडले. घटनास्थळी पंचनामा होत नाही तोवर मृतदेह हलू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गर्दी  नियंत्रणात आणण्यासाठी रॅपीड ॲक्‍शन फोर्सला पाचारण करण्यात आले.  

खापरखेडा पोलिसांनी ट्रक चालकांवर गुन्हा नोंदवला. सिल्लेवाडा येथील श्‍यामराव इरपाची असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. सुनीता यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. 

दुकाने फुटपाथवर
खापरखेड्यात रविवारी आठवडी बाजार असतो. रक्षाबंधनाचा दिवस असल्याने बाजारपेठेत  मोठ्या प्रमाणात दुकाने होती. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दुकानदारांनी दुकाने फुटपाथवर थाटली होती. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहने पार्किंग करण्यास येथील नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला.

वाहतूक पोलिसावर कारवाईची मागणी
घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून सुनीताचे पार्थिव ठाण्यात आणले. त्यामुळे पोलिस ठाण्यासमोर गर्दी झाली होती. नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्याची तसेच वाहनचालक व ट्रकमालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Web Title: Accident Death crime