खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या समस्येबाबत उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. 
मागील सुनावणीमध्ये, रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघाताना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलिस प्रशासनाने दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, दररोजच्या वाहतुकीमुळे नैसर्गिकरीत्या शहरामध्ये खड्डे निर्माण झाले आहेत. अशा अवस्थेमध्ये कुणाला दोषी मानू शकत नाही. मात्र, रस्ते खोदून ते न बुजविणाऱ्या ऑरेंजसीटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड आणि महावितरणच्या कंत्राटदारावर गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. 
मंगळवारी झोन आणि सक्करदरा परिसरामध्ये या कंत्राटदारांनी खोदकाम करीत संबंधित काम पूर्ण केले. यातून निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाले होते. तर, दोन प्रकरणामध्ये अपघाताला इतर वाहन चालकाला जबाबदार मानत त्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. 
एप्रिल 2019 पासून शहरातील खड्ड्यांमुळे 22 अपघात झाले. यामध्ये, एकाचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. न्यायालयाने पोलिस प्रशासन आणि महापालिकेला मागील सुनावणीमध्ये कठोर शब्दांमध्ये खडावले होते. या 22 अपघातांच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी (ता. 14) होणार आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com