गांधीनगरातून निघाली पाचजणांची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

वणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ) अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

वणी/महागाव, (जि. यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी गावानजीक झालेल्या भीषण अपघातातील अकराही मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात रविवारी (ता. नऊ) अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
कापूस वेचणीसाठी वणी व महागाव येथील मजूर परजिल्ह्यात गेले होते. तेथून वाहनाने परतताना काळाने घाला घातला. शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह गावी पाठविण्यात आले. वणी येथील गांधीनगराला मजुरांची वस्ती म्हणून ओळखल्या जाते. पाचही मृतांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली. यावेळी उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाही. शोभा निब्रट, पार्वती गेडाम, छाया लोहकरे, हातूनबी हमीद खॉं पठाण, संगीता टेकाम यांच्यावर वणी येथील मोक्षधामात तर चालक सुजित डवरे याच्यावर लालगुडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महागाव तालुक्‍यातील माळवागद येथील अमोल हटकर, कुसुम हटकर, क्रिश हटकर, उटी येथील गजानन नवघरे, वनीता हटकर यांच्यावर गावी अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेमुळे गांधीनगर, माळवागद, उटी येथील एकाही घरी चूल पेटली नाही.
दुष्काळी स्थिती असल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांचे लोंढे रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून कामाच्या शोधात गेलेल्या मजुरांना आपला जीव गमवावा लागला. अपघातात ठार झालेला अमोल हटकर हा पाच बहिणींमध्ये एक भाऊ होता. त्याच्या जाण्याने आईवडिलांचा आधार गेला आहे. अपघातातून आदित्य नवघरे केवळ नऊ महिन्यांचे बाळ सुखरूप वाचले. वडील गजानन व आई वनिता हे जग सोडून गेलेत. महागाव व वणी तालुक्‍यातील गावागावांत या अपघाताची चर्चा घरोघरी सुरू होती.

Web Title: accident news