तीन वर्षात दोन हजार पक्ष्यांनी गमावला जीव...संशोधनातून माहिती झाली उघड

file photo
file photo

अमरावती : रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या पक्षी प्रजातींची संख्या सर्वाधिक असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. भारद्वाज, लाल बुड्या बुलबुल, ठिपकेवाला पिंगळा, साळुुंकी, रातवा, नीलपंख, राखी वटवटा, होला, सातभाई, कोकीळ व चातक या प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील तीन वर्षात एकूण 1 हजार 910 पक्षी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेले आढळून आले. यामध्ये 55 पक्षी प्रजातींचा समावेश आहे.

जवळपास 3 पक्षी दर 30 किलोमीटरच्या अंतरात मृत्युमुखी पडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अमरावती ते चांदूर रेल्वे राखीव जंगल, अमरावती ते परतवाडा आणि परतवाडा ते सेमाडोह मेळघाटातील जंगलातून जाणारा अशा राज्य महामार्गाचा अभ्यास करण्यात आला. मृत्युमुखी पडणाऱ्या पक्ष्यांचा प्रजातींचा जनुकीय अभ्याससुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, सहा पक्ष्यांच्या प्रजातींची भारतातून प्रथमच माहिती जनुकीय बॅंकेत जमा करण्याचा मान प्रा. अमोल रावणकर यांना मिळालेला आहे.

भरधाव वेग, एलईडी लाइट पक्ष्यांच्या मुळावर

लॉकडाउनमुळे ही संख्या एकदमच कमी झाल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले. लॉकडाउनपूर्वीचे जे प्रमाण होते, ते लॉकडाउनमध्ये एकदमच कमी झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वाढती संख्या, भरधाव वेग व एलईडी लाइट पक्ष्यांच्या काही प्रजातींच्या मुळावर उठली असल्याचे संशोधनातून पुढे आले. अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख अमोल रावणकर यांनी यावर संशोधन केले आहे.

जनुकीय अभ्यास विषयावर संशोधन

प्रा. अमोल रावणकर यांनी अमरावती जिल्ह्यात मृत्युमुखी पडणारे विविध प्रजातींचे पक्षी आणि त्या मागील कारणांचा शोध तसेच त्यांचा जनुकीय अभ्यास विषयावर संशोधन केले आहे. या संशोधनासाठी त्यांना अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व पक्षी अभ्यासक डॉ. गजानन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.

ही आहेत कारणे

रस्ता अपघात, पक्ष्यांची शिकार व विक्री, उच्च दाबाच्या विद्युत तारांच्या संपर्क, विषमिश्रित अन्न व पाणी पिल्याने, अवकाळी वादळी-पाऊस आणि गारपीट, मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून, पतंगसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा, शेतामध्ये वापरण्यात येत असलेले कीटकनाशक, पिकाच्या संरक्षण, उन्हाळ्यातील तापमान, इमारतीवरील काचेवर आदळून तथा अन्नपाणी न मिळणे व आजारामुळे एकूण 82 प्रजातींचे पक्षी या विविध कारणांनी मृत्युमुखी पडल्याची नोंद त्यांनी घेतली आहे.

उपाययोजनेची गरज

पक्षी प्रजातींचे रस्ता अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कसे कमी करता येईल, यासाठी आणखी संशोधन आणि उपाययोजनांची गरज आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक डॉ. गजानन वाघ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com