दुर्दैवी! गेल्याच वर्षी पतीचा मृत्यू आणि आता अपघातात गमावला चार वर्षाचा मुलगा

रुपेश खैरी
Thursday, 24 September 2020

तळेगाव-आष्टी रोडचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे गावालगत तीन लेंथ आहे. त्यापैकी मधल्या लेंथनेच रहदारी सुरू असून दोन्ही बाजूच्या लेंथने सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू असलेला रोड कोणत्याच दिशेने बंद केला नाही. त्यामुळे कार चालकाने काम सुरू असलेल्याच लेंथने गाडी टाकली.

तळेगाव (जि. वर्धा) : गेल्या वर्षी पतीचे निधन झाले, मात्र ते डोंगराएवढे दु:ख मनात दडवुन ती पदर खोचून कामाला लागली कारण तिच्यावर तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. दिवसभर शेतामध्ये काबाडकष्ट करून ती पोरांचे आणि स्वतःचे पोट'कसेबसे भरत होती, मात्र नियतीला हे पाहावले नाही आणि तिच्यावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला.

रस्ता ओलांडताना तिच्या चार वर्षीय मुलाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या त्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्य महामार्ग तळेगाव-आष्टी रोडवर बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजता हा अपघात घडला. संकेत संजय चौधरी (वय ४) रा. तळेगाव, असे मृत बालकाचे नाव आहे.

तळेगाव- आष्टी राज्य महामार्गालगत असलेल्या जुन्या वस्तीत चौधरी कुटुंब वास्तव्यास असून संकेतच्या वडिलांचा आजारामुळे मागील वर्षीच मृत्यू झाला. कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी आईवरच आहे. संकेतची आई घरासमोरील शेतात कामावर गेली होती. बहीण आणि भावासोबत संकेत घरी होता. तो राज्यमहामार्गाच्या रुंदीकरण करण्यात आलेल्या रोडच्या काठाने शौचास गेला होता.

दरम्यान, रस्ता ओलांडून घराकडे येण्यास निघाला असता आष्टीकडून तळेगावकडे जाणाऱ्या एमएच २९-एल ९९४ या क्रमांकाच्या कारसमोर तो अचानक आल्याने त्याला कारची जोरदार धडक बसली. कार चालकाने घटनास्थळावरून कारसह पळ काढला. जखमी संकेतला ग्रामस्थांच्या मदतीने दुसऱ्या वाहनाने आर्वी येथील खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. तळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून रात्री उशीरा कारसह चालक पांडुरंग इंगळे (वय ४३) याला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा -  जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात विदर्भाच्या पुत्राला वीरमरण

मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात
तळेगाव-आष्टी रोडचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे गावालगत तीन लेंथ आहे. त्यापैकी मधल्या लेंथनेच रहदारी सुरू असून दोन्ही बाजूच्या लेंथने सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू असलेला रोड कोणत्याच दिशेने बंद केला नाही. त्यामुळे कार चालकाने काम सुरू असलेल्याच लेंथने गाडी टाकली. कंपनीच्या हलगर्जीपणाने हा अपघात झाल्याचा आरोप मृत बालकाच्या नातेवाइकांनी केला आहे. बालकाचा मृतदेह तळेगाव पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवून कन्स्ट्रक्‍शन कंपनीवर गुन्हा दाखल करा, तोपर्यंत मृतदेह हटविणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे काही वेळ पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of four year old child