छायाचित्र
छायाचित्र

दोन्ही हत्याकांडांतील आरोपी गजाआड

नागपूर ः नंदनवन हद्दीतील सेनापतीनगर येथे राहणारा विक्की विजय डहाके (22) या तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना, तर सय्यद इमरान हत्याकांडातील दोन आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक केली, अशी माहिती परिमंडळ-4च्या नवनियुक्त पोलिस उपायुक्त निर्मलादेवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खुनाची पहिली घटना सेनापतीनगर येथे घडली होती. दीड-दोन महिन्यांपूर्वी दुचाकीचा धक्का लागल्यावरून मृत विक्की आणि आरोपी राहुल पुल्लीवार यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी मी राहुलचा खून करणार, अशी धमकी त्याने वस्तीतील लोकांना दिली होती. ही माहिती अभिषेक ऊर्फ लावा याने राहुलला दिली होती. आपला गेम करण्यापूर्वी आपणच विक्कीचा गेम करू, असे राहुलने अभिषेकला सांगितले होते. मात्र, तेव्हापासून विक्की हा आरोपींच्या हाती सापडला नव्हता. 21 ऑगस्ट रोजी आरोपींनी विक्कीला सेनापतीनगरच्या मोकळ्या मैदानात नेले. काही वेळातच राहुल तेथे आला. त्यानंतर राहुल अण्णाजी पुल्लीवार, अभिषेक ऊर्फ लावा रामसिंग इवनाते (21), शुभम ऊर्फ भाला बिसनलाल मसकरे (21) दोन्ही रा. नरसाळा रोड, ऋषी नरेश पुट्टीवार (19, रा. रघूजीनगर वसाहत), शुभम दिलीप चाफले (19, रा. सर्वश्रीनगर), अक्षय श्रीकांत वाटकर (21, रा. बॅंक कॉलनी, नरसाळा रोड) आणि एक विधिसंघर्षग्रस्त मुलगा यांनी तीक्ष्ण शस्त्रांनी विक्कीच्या पोटावर, पाठीवर, कंबरेवर वार करून त्याचा जागीच खून केला आणि पळून गेले. आरोपी ऋषी पुट्टीवार आणि सागर महात्मे यांना अटक केल्यानंतर अन्य आरोपींना बुटीबोरीतून अटक केली, असेही निर्मलादेवी यांनी पत्रकारांना सांगितले.
खूनप्रकरणी दोघांना अटक
पैशाच्या वादातून केडीके कॉलेज रोडवरील राजेंद्रनगर येथे सय्यद इमरान याचा खून केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
आसिफ शेख हा घटनास्थळी हातठेल्यावर भाजीविक्री करीत होता. त्या वेळी आरोपी अक्षय शालिकराम करोते (24), अतुल केवलराम शेंडे (38) आणि विधिसंघर्षग्रस्त मुलगा हे आसिफच्या ठेल्यावर आले. आरोपींनी अद्रक आणि मिरची खरेदी करून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. पैसे न देता ते जाऊ लागले. आसिफने पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत आरोपींनी आसिफवर हल्ला करून रक्तबंबाळ केले. आसिफचा मित्र सय्यद इमरान हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता आरोपींनी त्याचा खून केला. पत्रकार परिषदेला नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण, सहायक निरीक्षक सचिन शिर्के, मिलिंद तायडे, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com