सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

नंदुराम लघुशंकेकरिता बाहेर गेला असताना आरोपी शिवप्रसाद हातात फावडा घेऊन आधीच लपून बसला होता. नंदुराम दिसताच त्याने फावड्याने त्याच्या डोक्‍यावर वार केला. तो खाली कोसळल्यानंतरही त्याने मारहाण सुरूच ठेवली.

गडचिरोली : जमिनीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून फावड्याने डोक्‍यावर वार करून सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

शिवप्रसाद सुनाराम टोपो (वय 38) रा. मल्लमपाडी, ता. एटापल्ली, असे शिक्षा देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा भाऊ मृत नंदुराम सुनाराम टोपो यांच्यासोबत आरोपी शिवप्रसाद टोपो याच्या जबरान जमिनीचा हिस्सा मागणीवरून भांडण झाले होते. यावेळी मृत नंदुराम यांनी वडिलांची संपूर्ण जमीन तुला दिली आहे. त्यामुळे मी स्वतः तोडलेल्या जमिनीचा हिस्सा देणार नाही, असे बजावले होते. 

याचा राग धरून 2 मार्च 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नंदुराम लघुशंकेकरिता बाहेर गेला असताना आरोपी शिवप्रसाद हातात फावडा घेऊन आधीच लपून बसला होता. नंदुराम दिसताच त्याने फावड्याने त्याच्या डोक्‍यावर वार केला. तो खाली कोसळल्यानंतरही त्याने मारहाण सुरूच ठेवली. आरडाओरड झाल्यानंतर मृताची मुले, पत्नी व इतर नागरिक गोळा झाले. त्यामुळे आरोपी तिथून पसार झाला. याबाबतची तक्रार खुलासो नंदुराम टोपो हिने एटापल्ली पोलिस ठाण्यात दिली. यावरून आरोपीविरुद्ध कलम 302 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. 

क्लिक करा : पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...

पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून शनिवारी (ता. 4) आरोपीस कलम 302 मध्ये जन्मठेप व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा न्यायनिवाडा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of killing brother sentenced to life imprisonment