मैत्रिणीचा बापच झाला हैवान, शाळेत जाताना साधली संधी मग...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

शाळेत गेलेली आठवर्षीय चिमुकली नऊ दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. तसेच ही घटना उघडीस येऊ नये, यासाठी मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला.

मुळावा/पोफाळी (जि. यवतमाळ) : गुरुवारी (ता. 12) रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थिनी गौरी ही शाळेत जाण्यासाठी निघाली. परंतु ती शाळेत पोहोचलीच नाही. आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून जिवे मारले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी दिली, त्याच दिवशी शुक्रवारी (ता.20) उघडकीस आली.

त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. गजानन विठ्ठल भुरके (रा. शांतीनगर, मुळावा), असे आरोपीचे नाव आहे. गौरी भास्कर गाडगे (वय 8, रा. हातला), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

गुरुवारी (ता. 12) रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थिनी गौरी ही शाळेत जाण्यासाठी निघाली. परंतु ती शाळेत पोहोचलीच नाही. शाळेत जाताना रस्त्यातूनच तिचे भुरके याने दुचाकीवर बसवून अपहरण केले. मुलगी सायंकाळपर्यंत घरी न पोहोचल्याने पालकांनी आजूबाजूला शोध घेऊन शाळेत विचारणा केली. त्यामुळे मुलगी आज शाळेतच आली नाही, अशी माहिती मिळाली. धक्का बसलेल्या गौरीच्या पालकांनी पोफाळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ दखल घेत शाळा परिसर पिंजून काढला. मात्र, तिचा कुठेही शोध न लागल्याने विविध चर्चांणा उधाण आले.

श्‍वान पथकास पाचारण केले

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले. गौरी आपल्या नेहमीच्या सायकल ठेवण्याच्या जागेवरून शाळेच्या पटांगणापर्यंत गेल्याचे श्‍वानपथकाद्वारा निष्पन्न झाले. परंतु विद्यार्थिनी वर्गात गेली नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली व तपासांदर्भात सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा व पोफाळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास घेतला असता मुलीला दुचाकीवरून नेल्याचे समोर आले.
सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी मुळावा येथील असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीने दिली खुनाची कबुली

पोलिस आरोपीच्या घरी तपासासाठी पोहचले असता, तो पसार झालेला होता. मोबाईलच्या सीडीआर फाईलद्वारे लोकेशन घेऊन आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी खंडाळा पोलिस ठाणे हद्दीतील लोहारा (तांडा) येथे असल्याचे समजले. तेथेही आपली दुचाकी सोडून आरोपी फरार झाला होता. पोलिस यंत्रणेने रात्रभर त्याचा शोध घेतला. अखेर शुक्रवारी रोहडा परिसरात त्याला पकडण्यात आले. मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून जिवे मारले. मृतदेह शिळोणा घाटात वनखात्याच्या जंगलात पुरल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपी गजाननची मुलगी चिमुकलीची मैत्रीण होती. ती त्याच्या सोबत गेली आणि घात झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा : प्रसुतीदरम्यान बेशुद्ध झाली महिला... मग डॉक्टरने केले असे काही

रास्ता रोको आंदोलन

निर्भयाच्या मारेकऱ्यांना शुक्रवारी पहाटे फाशी देण्यात आली. या घटनेला काही तास उलटत नाही तोच चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना उघडकीस येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुसद ते पोफाळी रोडवरील घटनास्थळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused murdered by torturing Chimukali