अमेरिकेतील मराठमोळे आमदार ठाणेदार यांनी नागपूरला दिली होती भेट, सुरेश भट सभागृहात गाजलेला डायलॉग ठरलाय खरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

america mla thanedar visit nagpur on last year

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने गतवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित १६ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी नागपूरला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. संमेलन पार पडले, पण नागपूरचे संबंध कधीही तुटले नाही. 

अमेरिकेतील मराठमोळे आमदार ठाणेदार यांनी नागपूरला दिली होती भेट, सुरेश भट सभागृहात गाजलेला डायलॉग ठरलाय खरा

नागपूर : 'आज मी मिशिगनचा गव्हर्नर नसेल झालो. पण, उद्या ट्रम्पना धडकी भरवेल हे निश्चित', हा नाटकातील अतिशय लोकप्रिय ठरलेला अखेरचा डायलॉग भारतीय वंशाचे डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी आज खरा करून दाखविला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. ठाणेदार यांनी केवळ दणदणीत विजयच मिळविला नाही तर, ट्रम्प यांना सत्तेवरून खाली खेचण्यात निर्णायक भूमिकादेखील वठविली. 

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. ठाणेदार डेमोक्रॅटिक पक्षाकडून ९३ टक्के मते घेऊन मिशिगन डिट्रॉयटमधून निवडून आले. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत ज्यो बायडेन यांना विजयी करण्यात ज्या ५३८ सिनेटर्सची निर्णायक भूमिका राहिली, त्यात डॉ. ठाणेदार यांचाही समावेश आहे. अमेरिकेत श्री नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी निवडणुकीपूर्वी चालविलेल्या 'श्री २०२०' कॅम्पेनची विजयात फार मोठी भूमिका राहिल्याचे सांगण्यात येते. 

हेही वाचा - अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक : महाविकास आघाडीकडून श्रीकांत देशपांडे रिंगणात

बेळगाव (कर्नाटक) येथील एका गरीब परिवारात जन्मलेले ६५ वर्षीय ठाणेदार अमेरिकेत उद्योजक, लेखक व राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सध्या अमेरिकेत स्थायिक झाले असले तरी त्यांनी भारताशी आपली नाळ कधीही तुटू दिली नाही. मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाटक क्षेत्रातील भारतीय कलावंतांशी त्यांचे नेहमीच जवळचे संबंध राहिले आहेत. या प्रेमापोटी ते अनेकवेळा भारतात येऊन गेले. भारतीय कलावंतांनाही ते अमेरिकेत नियमितपणे आमंत्रित करीत असतात. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने गतवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित १६ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी नागपूरला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. संमेलन पार पडले, पण नागपूरचे संबंध कधीही तुटले नाही. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : अनिल बोंडे पक्षासाठी प्रयत्न करणार, की बहिणीला दिलेला आशीर्वाद...

याच संमेलनात त्यांच्या 'ही श्रींची इच्छा' या आत्मचरित्राच्या ५० व्या आवृत्तीचे तसेच 'पुन्हा श्रीगणेशा' या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले होते. त्यांच्या चरित्राचे नाट्य रूपांतर करण्याची जबाबदारी त्यांनी नागपुरातील स्थानिक कलावंतांवर सोपविली होती. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित १९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनादरम्यान स्वचरित्रावर आधारित 'बायोपिक श्री' हे नाटक बघण्यासाठी ते खास नागपूरला आले होते. या नाटकातील 'आज मी मिशिगनचा गव्हर्नर नसेल झालो, पण उद्या ट्रम्पना धडकी भरवेल हे निश्चित'' हा गाजलेला अखेरचा डायलॉग डॉ. ठाणेदार यांनी पूर्णपणे खरा करून दाखविला. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना खरोखरच धडकी भरली असणार, हे नक्की. 

संपादन - भाग्यश्री राऊत


 

Web Title: America Mla Thanedar Visit Nagpur Last Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top