वैदर्भीय रंगकर्मींनी पुणे-मुंबईत येण्याची घाई करू नये - डॉ. गिरीश ओक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर - नागपूर किंवा विदर्भाच्या रंगकर्मींनी पुणे-मुंबईत येण्याची घाई करू नये, असा सल्ला मराठी ज्येष्ठ अभिनेते व नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक यांनी आज येथे दिला. 

नागपूर - नागपूर किंवा विदर्भाच्या रंगकर्मींनी पुणे-मुंबईत येण्याची घाई करू नये, असा सल्ला मराठी ज्येष्ठ अभिनेते व नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक यांनी आज येथे दिला. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे आज राष्ट्रभाषा सभेच्या धनवटे सभागृहात डॉ. गिरीश ओक व भरत जाधव या ज्येष्ठ अभिनेत्यांचा माजी खासदार दत्ता मेघे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अभामनाप नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे, उपक्रम विभागाचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, वनराईचे गिरीश गांधी, ज्येष्ठ रंगकर्मी किशोर आयलवार उपस्थित होते. डॉ. ओक नुकतेच नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष व भरत जाधव मध्यवर्ती कार्यकारिणीचे सभासद म्हणून निवडून आल्याने त्यांच्यासोबत मुक्तचर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित रंगकर्मींच्या प्रश्‍नांना डॉ. ओक आणि भरत जाधव यांनी उत्तरे दिली. 

ओक म्हणाले, आजवर जुने जे झाले, घडले ते सर्व पार पडले. यापुढे नाट्य परिषद जोमाने कामाला लागून प्रथम पडद्याच्या ‘समोर’ आणि ‘मागील’ बाजूमध्ये भरीव कार्य करणार आहे.  मराठी नाटक जिथे-जिथे असेल त्यावर परिषदेचा अंकुश असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील नाट्यगृहांची दुरवस्था यावर काम करायचे आहे. अशा नाट्यगृहांमुळे प्रेक्षक नाटकांपासून  दुरावला. नाट्य परिषद म्हणजे केवळ व्यावसायिक नाटके नव्हे तर एकंदरीत रंगभूमीच म्हणजे नाट्य परिषद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मध्यवर्ती कार्यकारिणीत सर्वांनाच योग्य प्रतिनिधित्व मिळाले. यामुळे रंगकर्मींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नागपूर किंवा विदर्भाच्या रंगकर्मींनी पुणे-मुंबईत येण्याची घाई करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. 

परिषदेचा उल्लेखच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद असा केला जातो. तरीही आम्ही फक्त महाराष्ट्राचाच विचार करतो आणि थांबतो. नवीन कार्यकारिणी नाटकाला अखिल भारतीय स्वरूप देण्यास कार्य करणार आहे.

भारतातील सर्व केंद्रात फक्त पुणे-मुंबईची नव्हे तर नागपूर-विदर्भातील मराठी नाटके पोहोचली पाहिजे. नागपुरात प्रतिभेची कमी नाही. उशिरा यश मिळाले तरी चालेल कारण यामुळेच खाचखळगे कळतात. त्यामुळे टेकूची गरज पडत नाही. यश जगाचे कधीच नसतं ते स्वत:च असतं. खऱ्या रंगकर्मींनी रंगभूमीशी संबंधित साउंड, लाइट,  रंगरेषा, नेपथ्य आदी सर्वांचेच ज्ञान मिळवावे प्रसंगी चहा आणून देण्याचीही ही तयारी ठेवावी असाही सल्ला दिला, भरत जाधव यांनी दिला. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

Web Title: actor pune mumbai dr. girish oak