अकोला : व्यसनाधीन मुलाने केली बापाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

बोरगाव मंजू पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कानशिवणी येथे अल्पभूधारक शेतकरी नामदेव शामराव राऊत हे मुलगा चंदूसोबत त्याच्या घरासमोरील अंगणात झोपलेले होते.

कानशिवणी : ज्याने लहानाचे मोठे करून त्याचा संसार उभा करण्यात हातभार लावला. अशा आपल्या जन्मदात्या बापाला त्याच्या व्यसनाधीन मुलाने चक्क  डोक्यात लोखंडी सळी मारून गंभीर जखमी केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील कानशिवणी गावात शुक्रवारच्या मध्यरात्री घडली आहे.

बोरगाव मंजू पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कानशिवणी येथे अल्पभूधारक शेतकरी नामदेव शामराव राऊत हे मुलगा चंदूसोबत त्याच्या घरासमोरील अंगणात झोपलेले होते. दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समजते आणि या वादातून चंदूने वडील नामदेव राऊत यांना लोखंडी सळीने मारून जखमी केले. यानंतर त्याने जखमी वडिलाला कुटार असलेल्या खोलीत फरफट नेऊन टाकून दिले. मात्र, डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा चंदूची आई मुलींच्या सासरी भेटीसाठी गेली असल्याचं समजते. घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांना कळताच त्यांनी तात्काळ आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.  

तसेच श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. पंचनामा करून त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. दरम्यान, हत्या ही मुलाच्या वाईट व्यसनाधीन ते मधून घडल्याची पोलिस सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. मारेकरी मुलगा रात्रीच फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A addict person has made the father murder in Akola