प्रशासन पडले चिंतेत; भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक 

दीपक फुलबांधे 
सोमवार, 13 जुलै 2020

भंडारा शहरातील 30 वर्षीय कापड दुकानदाराला गेल्या सोमवारी ताप व खोकला झाला. त्यासाठी त्याने होमियोपॅथी दवाखान्यातून औषध घेतले. परंतु, खोकला वाढल्याने बुधवारी खासगी रुग्णालयात गेला. एक्‍स-रे वरून त्याला निमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले

भंडारा : लॉकडाउनपासून अल्प प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. परंतु, त्यातील बहुतेकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा आजार सामान्य ठरत होता. परंतु, आता लागोपाठ दोघांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 

हे वाचा — विश्‍वास बसेल का? मुख्यमंत्री उद्धवजी आमदार झाले मात्र निधी नाही, वाचा संपूर्ण प्रकार...

नागरिकांत बिनधास्तपणा 

भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मिळाला होता. तेव्हापासून परराज्यातून व महानगरातून येणारे विद्यार्थी, कामगार, नागरिकांना यांना संस्थात्मक क्वारंटाइन ठेवण्यात येत होते. जिल्हा व तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरमध्ये तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 174 रुग्ण मिळाले असले तरी, त्यापैकी निम्म्याहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे लॉकडाउन संपल्यापासून कोरोनाची भीती असली तरी, नागरिकांत बिनधास्तपणा दिसत आहे. 
गुरुवारी साकोली व लाखनी येथे अचानक रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात एकाच दिवशी 49 रुग्ण मिळाले. तसेच मोहाडी तालुक्‍यात 10 महिन्यांचा बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे संपूर्ण गावात कंटेन्मेंट जाहीर होण्याची वेळ आली आहे.

 हे वाचा—आई रडत रडत म्हणाली, बाळा पब्जी नको खेळू रेऽऽ नाही तर तू पण...
 

दोघांचा कोरोनामुळे मृत्यू 

भंडारा शहरातील 30 वर्षीय कापड दुकानदाराला गेल्या सोमवारी ताप व खोकला झाला. त्यासाठी त्याने होमियोपॅथी दवाखान्यातून औषध घेतले. परंतु, खोकला वाढल्याने बुधवारी खासगी रुग्णालयात गेला. एक्‍स-रे वरून त्याला निमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. नंतर गुरुवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांनी नागपूरला मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. परंतु, त्याचा रविवारी मृत्यू झाला. नंतर सारी व कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. तसेच गणेशपूर येथील वृत्तपत्र वाटप करणारा 33 वर्षीय ताप, खोकला व सर्दीचा त्रास झाल्याने तो शुक्रवारी खासगी रुग्णालयात दाखल झाला. नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. परंतु, त्याचा आज, सोमवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारणही कोविड असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे. 
 

 —संकलन : चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration is worried about the outbreak of corona in Bhandara district