चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय हवेतच

प्रकाश बनकर
शनिवार, 13 मे 2017

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळ विकासासंदर्भात स्वतंत्र बैठक झाली. त्याच प्रमाणे औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतही बैठक घेतल्यास प्रश्‍न मार्गी लागतील.
- आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआय

औरंगाबाद - येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणास जानेवारी 2016 मध्ये मंजुरी मिळाली. पण, त्यानंतर राज्य शासनाने कोणतीच हालचाल केली नाही. दरम्यान, "उडान' योजनेतून औरंगाबादला वगळले; त्यामुळे विस्तारीकरण रखडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

डीएमआयसीमुळे शहरात विदेशी कंपन्या येणार आहेत. त्यामुळे हवाई वाहतुकीचाही विस्तार होणे गरजेचे आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरण वर्ष 2007 पासून प्रयत्न करीत होते. त्याला तब्बल नऊ वर्षांनी मंजुरी मिळाली. यासाठी 182 एकर जमिनीचे भूसंपादन करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, ऑक्‍टोबर 2016 मध्ये शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विस्तारीकरणास पुन्हा मंजुरी मिळाली. एवढेच नाही; तर यासाठी लागणाऱ्या दोनशे कोटी रुपयांचा खर्च राज्य शासन उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर स्थळ पाहणीही झाली. मात्र, दीड वर्षानंतरही हे विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत राज्य सरकारतर्फे घोषणा आणि आश्‍वासनाशिवाय काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत.

जेवढा उशीर, तेवढा खर्च वाढणार
विमानतळ विस्तारीकरणाच्या घोषणेनंतर विमानतळ प्राधिकरण, महसूल विभाग, सिडको आणि महापालिकेतर्फे नोव्हेंबर 2016 मध्ये 182 एकरची स्थळपाहणी करण्यात आली. यामध्ये संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीवर आठशे घरे असल्याचा अहवाल देण्यात आला. या आठशे कुटुंबीयांचे पुनर्वसन झाल्याशिवाय ही जागा मिळणार नसल्याने राज्य सरकारने पुनर्वसनासाठी दोनशे कोटी रुपये देण्याचे ठरविले. पण, आता ही रक्कम कमी पडणार असून, 500 कोटी रुपये लागणार असल्याचे स्थळ पाहणीतून पुढे आले. हे काम वर्षभरापूर्वी झाले असते; तर राज्य सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले असते. आता आणखी उशीर झाल्यास विस्तारीकरणाचा खर्च पुन्हा वाढणार असल्याचे तज्ज्ञांतर्फे सांगण्यात येत आहे.

विमानतळाचा प्रस्तावित विस्तार
- चिकलठाणा विमानतळाची सध्याची असलेली धावपट्टी 2700 फुटांनी वाढविण्यात येणार.
- बोइंगचे 77-300 एअर बसचे A-330चे मोठे विमान उतरविण्याची सुविधा येथे उपलब्ध होणार.
- विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू होणार.
- आखाती आणि युरोपीय देशांसाठी थेट विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली.
- आंतरराष्ट्रीय नियमानुसार विमानतळाच्या ऑपरेशनसाठी आवश्‍यक असलेले समांतर टॅक्‍सी-वे होणार.
- धावपट्टीच्या शेवटच्या जागेपर्यंत दिवे लावण्यात येणार.
- धावपट्टीचा विस्तार वाढवून विमान कनेक्‍टिव्हिटी वाढविण्यात येणार.

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळ विकासासंदर्भात स्वतंत्र बैठक झाली. त्याच प्रमाणे औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतही बैठक घेतल्यास प्रश्‍न मार्गी लागतील.
- आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआय

Web Title: administrative negligence in chikalthana