शाळा प्रवेशाचे वय शिथिल; राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आदेश, असे आहेत बदल

प्रभाकर कोळसे
Monday, 21 September 2020

सरकारने प्राथमिक शिक्षण संचालकांची एक सदस्यीय समिती देखील नेमण्यात आली होती. नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुलाच्या वयाच्या अडीचव्या वर्षी प्ले ग्रुप नर्सरी तर वयाच्या साडेपाचव्या वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार आहे.

नंदोरी (जि. वर्धा) : राज्य सरकारने मुलांच्या शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले आहे. आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रुप नर्सरी तर साडेपाच वर्षांच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. शालेय सत्र २०२१-२२ पासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे.

ज्या मुलांचे वय ३१ डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून व त्यानंतरच्या काळात प्ले ग्रुप नर्सरीत प्रवेश घेता येईल. याचा अर्थ अडीच वर्षांच्या वयातच त्यांना प्रवेश मिळेल. ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होतील त्यांना जून व त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल. हा नियम आगामी सत्र २०२१-२२ पासून लागू करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी डॉ. बंग यांनी दिला सल्ला!

शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयात शिथिलता आणण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. अशा संदर्भातील अडचणी लक्षात घेता त्यावर उपाय योजना करण्यासाठी सरकारने प्राथमिक शिक्षण संचालकांची एक सदस्यीय समिती देखील नेमण्यात आली होती. नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुलाच्या वयाच्या अडीचव्या वर्षी प्ले ग्रुप नर्सरी तर वयाच्या साडेपाचव्या वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार आहे.

मुख्याध्यापकांचा हा अधिकार घेतला काढून

यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत अनुक्रमे तीन आणि सहा वर्षे वय पूर्ण करणाऱ्या मुलांना प्ले ग्रुप नर्सरी, पहिलीत प्रवेश दिला जात होता. प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसाची शिथिलता देण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. मात्र, आता मुख्याध्यापकांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे.

हेही वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

कमी वयात मुलांवर भार

या आदेशामुळे साडेपाच वर्षांचा मुलाला इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येणार असल्याने सहा वर्षांखालील मुलांच्या शारीरिक क्षमता, आकलनविषयक क्षमता पूर्णपणे विकसित होत नसल्याने या कमी वयात मुलांना शिक्षणाचा भार पेलावा लागणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission will be available for the first class in five and a half years