लाखो दमा रुग्णांनी घेतला औषधाचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

देसाईगंज : येथून सात किमीवर असलेल्या कोकडी या गावात मृग नक्षत्राच्या पर्वावर देण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक दमा औषधीचा देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास लाखो नागरिकांनी लाभ घेतला. मागील तीन दशकांहून अधिक काळापासून येथील वैद्य प्रल्हाद कावळे कोकडी येथे मोफत औषध देऊन नागरिकांना दमामुक्त करीत आहेत. शनिवारी (ता. 8) सायंकाळी 6 वाजता औषध वितरणाचा श्रीगणेशा करण्यात आला.

देसाईगंज : येथून सात किमीवर असलेल्या कोकडी या गावात मृग नक्षत्राच्या पर्वावर देण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक दमा औषधीचा देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास लाखो नागरिकांनी लाभ घेतला. मागील तीन दशकांहून अधिक काळापासून येथील वैद्य प्रल्हाद कावळे कोकडी येथे मोफत औषध देऊन नागरिकांना दमामुक्त करीत आहेत. शनिवारी (ता. 8) सायंकाळी 6 वाजता औषध वितरणाचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, मानव कल्याण सेवाधाम आश्रम परसवाडाचे नाना महाराज, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार हरीराम वरखडे, सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, देसाईगंजचे नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पंचायत समिती सदस्या अर्चना ढोरे, सरपंच सुधीर वाढई, माजी सभापती परसराम टिकले, माजी सभापती दिगंबर मेश्राम, नगरसेवक राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी आदी उपस्थित होते.
देसाईगंज तालुक्‍यातील कोकडी या गावात मागील 38 वर्षांपासून सातत्याने असाध्य अशा दमा आजारावर मृग नक्षत्राच्या पर्वावर प्रल्हाद कावळे आयुर्वेदिक दमा औषध शाकाहारी रुग्णांना पाण्यातून; तर मांसाहारी रुग्णांना गणी, भुरभुसा, सारंगी या जातीच्या बारीक मासोळ्यांतून देत आहेत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. वैद्यकीय क्षेत्रात दमा या असाध्य आजारावर प्रभावी औषध अद्याप उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र कावळे यांनी शोधलेल्या आयुर्वेदिक दमा औषधाचे सातत्याने तीन वर्षे सेवन केल्याने आजवर लाखो लोक या आजारातून मुक्त झाले. हमखास फायदा होत असल्याने अनमोल औषधाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातूनच प्रचार आणि प्रसार झाला. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून या औषधाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचे जत्थेच्या जत्थे एक दिवसापूर्वीच डेरेदाखल झाले. त्यामुळे शनिवारी या गावात प्रचंड गर्दी होती. लोकसहभागातून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमातून आजवर लाखो दमा रुग्णांना लाभ झाला. अनेक रुग्णांनी कावळे यांना शाल, श्रीफळ देऊन तर त्यांच्या पत्नीला साडी, चोळी देऊन सन्मानित केले.
मोबाईल शौचालयासह इतर सोयी
लोकसहभागातून दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाला शासकीय पातळीवरूनही जमेल तसे सहकार्य करण्यात आले. औषधासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यावर्षी प्रथमच देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने मोबाईल शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची, नाश्‍त्याची; तर गावकऱ्यांतर्फे जेवणाची सोय करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, कोकडी, तुळशी व बोळधा येथील भोई समाजबांधवांनी मासोळ्या उपलब्ध दिल्या. देसाईगंज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसची सोय करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advantages of Medicines taken by millions of asthmatic patients