स्वतंत्र राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ठिय्या

Andolan
Andolan

गडचिरोली : कोरोना काळातील जनतेचे वीज बील सरकारने भरावे, २०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि त्यानंतर निम्मे दर करावे, शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून मुक्त करावे, अतिवृष्टी, पूरपीडित शेतकऱ्यांना हेक्‍टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तत्काळ करावी, या मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी (ता. ७) विदर्भातील ११ जिल्ह्यांतील १२० तालुक्‍यांत ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच ४ जानेवारीला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे यांनी दिली.

काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या अधिवेशनात विदर्भ राज्य देण्याचे पाचवेळा ठराव केले. स्वातंत्र्यानंतर दार कमिशन, फझलअली कमिशन, जेव्हीपी कमिशन, संगमा समिती यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याची केंद्र सरकारला शिफारस केली. परंतु त्यांची सत्ता असूनही त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य दिले नाही. भाजपनेसुद्धा १९९७ ला भुवनेश्‍वर येथील अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव केला.

निवडणुकीत जनतेला आश्‍वासन देऊन सत्ता आल्यावर विकासाच्या बाता करायला लागले. अशाप्रकारे दोन्ही पक्षांनी विदर्भातील जनतेशी बेईमानी केली असून जनतेचा विश्‍वासघात केला. राज्य निर्मितीची प्रक्रिया केंद्र सरकारच करू शकते, म्हणून भाजपने दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अन्यथा विदर्भातील आताच्या निवडणुकीत जी परिस्थिती भाजपची झाली तिची पुनरावृत्ती पुढील निवडणुकीत होईल, अशाही इशारा समितीने दिला आहे. 

गडचिरोली शहरात आयोजित आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे यांच्यासह रमेश भुरसे, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, एजाज शेख, अमिता मडावी, प्रतिभा चौधरी, जनार्दन साखरे, दत्तात्रेय पाचभाई, गुरुदेव भोपये, श्‍याम वाढई, रमेश चौधरी, युवराज बोरकुटे, देवानंद भुरसे, गणेश कन्नाके, युसूफ खान पठाण, जुगनुसिंग पटवा, नारायण म्हस्के आदी सहभागी झाले होते.

कुरखेड्यात चक्‍काजाम...

पावसाळी धानपिकांचे नुकसान झाल्याने उन्हाळी धानपिकांचे उत्पादन घेऊन शेतकरी विस्कटलेली घडी पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु महाआघाडी सरकार फक्त आठ तास वीज देऊन शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मोडता घालत आहे. म्हणून चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. ७) आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात कुरखेडा येथील वडसा- कुरखेडा मार्गावरच्या गुरनोली फाट्यावर चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरेंद्र चंदेल, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, विलास गावंडे, चांगदेव फाये, व्यंकटी नागीलवार, दलपत गोटेफोडे, बबलू हुसैनी व बबलू शेख तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते.

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com