आणखी चार घाटांवर मोक्षकाष्ठांनी अंत्यसंस्कार

राजेश प्रायकर
रविवार, 8 एप्रिल 2018

काय आहे मोक्षकाष्ठ? 
शेतात धान्य निघाल्यानंतर उरलेला चोथा शेतकरी जाळून टाकत असतो. पण, हाच चोथा मोक्षकाष्ठ तयार करण्यासाठी उपयोगात येतो. मोक्षकाष्ठ एकप्रकारच्या लाकडाच्या विटाच आहेत. सध्या नागपूर जिल्ह्यात मोक्षकाष्ठ तयार करणाऱ्या सहा कंपन्या आहेत.

नागपूर - एका मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी १५ वर्षे वयाच्या दोन झाडांचे लाकूड लागत असते. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने महापालिकेने इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनच्या सहकार्याने घाटांवर मोक्षकाष्ठाने अंत्यसंस्काराचा पर्याय शोधून काढला. सध्या अंबाझरी घाटावर मोक्षकाष्ठाने अंत्यसंस्कार केले जातात. यात आणखी चार घाटांचा समावेश होणार असून पुढील वर्षापर्यंत संपूर्ण घाटांवर मोक्षकाष्ठाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

महापालिकेने काही घाटांवर डिझेल शवदाहिनी तसेच विद्युत शवदाहिनी सुरू केली. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे घाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचाच वापर कायम होता. त्यामुळे झाडांची कत्तल ओघानेच आली. परंपरा आणि अनेकांच्या भावभावना अंत्यसंस्काराशी जोडलेल्या असतात. त्यामुळे विद्युत शवदाहिनी किंवा डिझेल शवदाहिनीचा वापर नागरिक करीत नाही. यावर उपाय म्हणून इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे प्रणेते विजय लिमये यांनी एक नवीन उपाय शोधून काढलाय.

मोक्षकाष्ठ नावाने लाकडासारखी वस्तू खास अंत्यसंस्कारासाठी त्यांनी तयार करून घेतली. यामुळे नागरिकांची श्रद्धा आणि परंपरा तर सांभाळली जातेच. शिवाय झाडांची कत्तलही कमी होत आहे. २०१५ मध्ये सर्वप्रथम लिमये यांच्या संस्थेमार्फत पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविण्यात आला. त्यानंतर त्यांनी महापालिकेला प्रस्ताव दिला. महापालिकेने पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराला प्रोत्साहन देण्यासाठी अंबाझरी घाटावर पथदर्शी प्रकल्प राबविला. सध्या अंबाझरी या एकमेव घाटावर मोक्षकाष्ठाने अंत्यसंस्कार केले जातात. या घाटावर मोक्षकाष्ठ निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आले असून लाकडांचा कमीत कमी वापर व्हावा, याकरिता येथे लाकडांसाठी शुल्क आकारले जाते. अंबाझरी घाटाच्याच धर्तीवर आणखी चार घाटांवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत लिमये यांच्या संस्थेने महापालिकेला प्रस्ताव दिला असून महापालिका यावर गंभीर असून स्थायी समितीपुढे याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे. मोक्षधाम, मानकापूर आदी चार घाटांवर मोक्षकाष्ठ उपलब्ध करून दिल्यानंतर तेथे ते अंत्यसंस्कारासाठी निःशुल्क देण्यात येईल. मात्र, लाकडांचे पैसे आकारले जातील, असे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले. 

शेतकऱ्यांना रोजगाराची संधी  
शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. यासाठी शेतकरी शेतीतील कचऱ्याची थेट विक्री करू शकतात, यातून शेतकऱ्यांना रोजगाराची संधी आहे.  

पंतप्रधानांनीही केले कौतुक 
मोक्षकाष्ठाने अंत्यसंस्काराच्या संकल्पनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून कौतुक केले. राज्यात दरवर्षी वनमंत्रालयाकडून कोट्यवधी रोपटी लावली जातात. मात्र, मोक्षकाष्ठाने अंत्यसंस्काराबाबत सरकार गंभीर नाही, हा विरोधाभासही आहे. 

२०१९ पर्यंत संपूर्ण शहरातील घाटांवर मोक्षकाष्ठ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. २०२० पर्यंत शहरातील घाटांवर लाकूड दिसणार नाही. त्यामुळे झाडे वाचतील. नागपूरसह यवतमाळ, सांगली येथेही मोक्षकाष्ठाने अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. 
-विजय लिमये, प्रणेते, इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशन. 

आणखी चार घाटांवर मोक्षकाष्ठाच्या वापरासाठी इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनचा प्रस्ताव आहे. त्यावरून महापालिका नवीन प्रस्ताव तयार करीत आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवून मंजूर केल्यानंतर शहरातील चार घाटांवर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुरू होतील. 
-डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) महापालिका.

Web Title: agriculture garbage mokshakast funeral