दोन एकरांचा विमा १०२ रुपये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

‘शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा म्हणजे त्यांना नुकसानभरपाई मिळेल,’ हा घोषा लावत विमा कंपन्यांच्या दावणीला बांधल्याप्रमाणे प्रशासन झपाटले आहे. मात्र, याच विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंझोरी येथील सोनल राठोड या शेतकरी महिलेच्या दोन एकर कपाशीला पीकविमा १०२ रुपये ७७ पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केल्याचा संदेश पाठविण्याचा उद्दामपणा विमा कंपनीने केला आहे.

इंझोरी, (जि. वाशीम) - ‘शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा म्हणजे त्यांना नुकसानभरपाई मिळेल,’ हा घोषा लावत विमा कंपन्यांच्या दावणीला बांधल्याप्रमाणे प्रशासन झपाटले आहे. मात्र, याच विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंझोरी येथील सोनल राठोड या शेतकरी महिलेच्या दोन एकर कपाशीला पीकविमा १०२ रुपये ७७ पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केल्याचा संदेश पाठविण्याचा उद्दामपणा विमा कंपनीने केला आहे. 

सोनल राठोड यांच्याकडे दोन एकर शेती आहे. २०१८-१९ च्या खरीप हंगामात नदीच्या काठावर असलेल्या दोन एकरांतील कपाशीचा त्यांनी सोळाशे रुपये भरून विमा हप्ता भरला होता. गेल्या वर्षी अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील उभे पीक पुराने वाहून गेले होते. शेतीचा पंचनामा होऊन, नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळविली होती. एका वर्षानंतर पिकाची नुकसानभरपाई मिळाल्याचा संदेश त्यांना नुकताच आला. दोन एकरांच्या कपाशीच्या नुकसानीचा विमा केवळ १०२ रुपये ७७ पैसे मंजूर झाल्याचे त्या संदेशात नमूद केले होते. विमा काढताना कागदपत्रांना लागणाऱ्या पैशांएवढाही विमा न मिळाल्याने, विमा कंपनीकडून या शेतकरी महिलेची फसवणूक करण्यात आली, अशी चर्चा परिसरात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Insurance Issue