सणासुदीच्या दिवसांतच गेले पीक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

नागपूर - दसरा-दिवाळी आली की पिकांना बहर येतो. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. यंदाच्या पावसाने कशीबशी साथ दिल्याने शेत हिरवंगार झालं होतं. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या परतीच्या पावसाने कहरच केला आणि शेतकरी पुन्हा खचला.

नागपूर - दसरा-दिवाळी आली की पिकांना बहर येतो. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होतात. यंदाच्या पावसाने कशीबशी साथ दिल्याने शेत हिरवंगार झालं होतं. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या परतीच्या पावसाने कहरच केला आणि शेतकरी पुन्हा खचला.

कुही तालुक्‍यात वादळ
कुही तालुक्‍यातील देवळीकला, देवळी खुर्द, खेडा परिसरात वादळी पाऊस झाला. त्यामुळे धान, मिरची, पराटी हे पीक नेस्तनाबूद झाले. देवळीकला येथील गोपाल उरकुडे, नानेश्‍वर खेडकर, धनराज रोहाड, माजी सरपंच राजू खेडेकर, व्यंकट खेडेकर, रामदास खेडेकर, श्रीरंग रामचंद्र रडके, रामचंद्र उरकुडे, अशोक चंदनबावणे, भीमराव कावळे, रमेश चव्हाण, सुखदेव आदोळे या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. कुहीचे तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. पंचायत समितीचे माजी सभापती अरुण हटवार यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली.

थोडी खुशी, जादा गम
अरोली परिसरात धानपीक घेतले जाते. या आठवड्यात झालेल्या पावसाने काहींना फायदा तर अनेकांचे नुकसानच झाले. धान पिकांवर तुडतुडा रोगाची लागण झाली आहे, तर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने धानपीक जमिनीवर लोटले. सद्यस्थितीत धानपिकाला गर्भी पोटरी (फुटवा) आला असून, असाच पाऊस सुरू राहिल्यास फुलवा झडून उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची भीती शेतकरी प्रशांत आडगुलकर, महेंद्र मेहर, गणेश बावनकुळे, दिनेश  गुरनुले, प्रदीप फटिंग, रमेश चांदूरकर, राजेश खडतकर यांनी व्यक्त केली.

४० टक्के नुकसान
उमरेड : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटल्याने मालाला कमी किमतीत विकावे लागेल. कापसाच्या झाडांची पाने गळून पडली. त्यामुळे सोयाबीन व कापसाला भाव न मिळण्याची शक्‍यता परसोडी येथील शेतकरी फुलचंद्र अगडे यांनी बोलून दाखविली.

धानाला लाभ, सोयाबीनला तोटा
साळवा : पाऊस पडूनही वातावरणात उष्णता कायम असल्याने पिकावर रोगांचा सावट वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे कापूस या पिकावर अळी व तुडतुड्यासारखे रोग आलेत. पावसामुळे मिरची व धान पिकांना फायदा झाला, तर सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याचे अशोक सायरे, पुरुषोत्तम लेंडे, हिवराज अतकरी यांनी सांगितले. तर रामटेकच्या महिला शेतकरी लक्ष्मी नागपुरे यांच्या मते धान पिकासाठी पाऊस चांगला आहे. मात्र, आता पावसाची गरज नाही, जर पाऊस झाला तर नुकसान होऊ शकते.

भुईमूग भुईसपाट
या पावसामुळे सोयाबीन व भुईमूगच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वेळी पावसामुळे सोयाबीन व भुईमूगला अंकुर फुटल्याचे काटोल येथील युवा शेतकरी गणेश शंकरराव राऊत यांनी सांगितले.

Web Title: agriculture loss in nagpur