कृषी अधिकारी सक्‍तीच्या रजेवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

गडचिरोलीतील प्रकार; महिला कर्मचाऱ्यास घरी बोलावल्याची तक्रार

गडचिरोलीतील प्रकार; महिला कर्मचाऱ्यास घरी बोलावल्याची तक्रार
नागपूर - सरकारी काम संपल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याने एका महिला कृषी सहायकास थेट घरी येण्याचा आग्रह धरला. पतीसोबत ही महिला त्या अधिकाऱ्याच्या घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी "नवऱ्याला सोबत का आणले,' म्हणून तिच्याशी वाद घातल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. शेख यांना 19 डिसेंबरपासून रजेवर पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्‍त कार्यालयाला चौकशीचा आदेश दिला आहे. लवकरच संबंधीताविरोधात कारवाईची शक्‍यता वर्तविली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागातील महिलांच्या शोषणाच्या घटना वारंवार घडत आहेत. गडचिरोली तालुका कृषी अधिकारी इनायत शेख याने काम संपल्यावर महिला कृषी सहायकास घरी बोलावल्याच्या खळबळजनक प्रकाराची यात भर पडली आहे. महिलेने याबाबत पतीला सांगितले. त्यानंतर ती पतीला घेऊन गडचिरोलीत शेख याच्या घरी पोचली. तो घरी एकटाच राहतो. हे दांपत्य पोचल्यानंतर कोणतेही काम नसल्याचे सांगत शेख याने त्यांना परत पाठविले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित महिलेला "नवऱ्याला सोबत का आणले, एकटीच का आली नाही,' असे म्हणून चांगलेच दरडावले. या प्रकाराने घाबरून तिने पतीच्या संमतीने थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. विशेष म्हणजे मे 2016 मध्ये केलेली ही तक्रार अद्यापही चौकशीतच आहे.

कार्यालयातील इतर पाच महिला कर्मचाऱ्यांनीही त्याच्याविरोधात आता तक्रार केली. त्यामुळे विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर कारवाईच्या हालचाली वाढल्या आहेत. मात्र विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय याप्रकरणात शेखला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संबंधित कार्यालयाच्या महिला कर्मचाऱ्यांनी बोलताना केला. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी तांबे यांना पाठविण्यात आले. त्याऐवजी एखाद्या महिला अधिकाऱ्याला का पाठविण्यात आले नाही, असेही महिलांचे म्हणणे आहे.

अधीक्षक कृषी अधिकाऱ्याविरोधातही तक्रार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व "आत्मा'चे तत्कालीन प्रकल्प संचालक अनंत पोटे अर्वाच्च भाषा वापरत असल्याची तक्रार यापूर्वी त्याच्याच कार्यालयातील वर्ग एकच्या महिला अधिकाऱ्याने केली होती. विशाखा समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. 22 डिसेंबर रोजी या प्रकरणाची प्रत संबंधित महिला अधिकाऱ्यास मिळाली. याप्रकरणात पोटे यांना तंबी देण्यात आली आहे. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत त्यांच्यावरील बहुतांश आरोप समितीने फेटाळले होते.

महिला कृषी सहायक तसेच गडचिरोली तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी इनायत शेख या तालुका कृषी अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली आहे. याप्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे. सध्या शेख यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. याप्रकरणाचा अहवाल आल्यानंतर निश्‍चितच कारवाई होईल. खात्याची बदनामी करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही
- विकास देशमुख कृषी आयुक्‍त, पुणे

Web Title: Agriculture officer on compulsory leave