चळवळीतील अजातशत्रूची एक्झिट, सच्च्या कार्यकर्त्याची शोकांतिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

 

 

नागपूर ः चळवळीतील कार्यकर्ता म्हटले की, खुरटी दाढी, लाल डोळे अन्‌ चेहऱ्यावर तणाव दिसतो. मात्र, हा कार्यकर्ता निराळाच. गोरापान चेहऱ्याचा, नेहमीच पांढऱ्या कपड्यात असलेला स्मार्ट असा हा कार्यकर्ता. यांच्याजवळ सारे वैभव. परंतु, वैभवाचा गर्व नाही. घरी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत अतिशय प्रेमाने वागणारा हा कार्यकर्ता. संघर्षातील आयुष्य संपल्यानंतर नव्या उमेदीने राजकीय कॅनव्हासवर दिसतील, राजकीय चळवळीत झेप घेतील असे चित्र दिसत असतानाच नियतीने घाव घातला. अन्‌ त्यांचे जगणेच हिरावून घेतले. एका अपघातामध्ये त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. ऐन पन्नाशीत त्यांना मेंदूचा आघात झाल्याने हा कार्यकर्ता व्हीलचेअरवर आला, ही उत्तर नागपुरातील राजा द्रोणकर या चळवळीतील कार्यकर्त्याची शोकांतिका.

विशेष असे की, राजा द्रोणकर यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यांची पत्नी कल्पना, मुलगी शिंपली आणि मुलगा शांक्‍य यांनी बुधवारच्या मध्यरात्री 12 वाजता लग्नाचा वाढदिवस साजरा केला आणि गुरुवारी सकाळी निधन झाल्याची बातमी कानावर आली. या कार्यकर्त्याच्या आंदोलनाचा एक पट नजरेसमोर उभा झाला. युवक कॉंग्रेसमध्ये असलेल्या या कार्यकर्त्याची जवळीक दिवंगत विलासराव देशमुख यांच्यापासून तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी. माजी खासदार विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे यांच्यापासून तर रणजित देशमुख या वरच्या नेत्यांशी संबंध होता. परंतु, त्यांनी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून साऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क केला.

आंबेडकरी चळवळीत राजाभाऊ कार्यरत होते. रिपब्लिकन मूव्हमेंटचे नरेश वहाणे असो, रिपब्लिकन पार्टीचे राजन वाघमारे असो, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असो की, रिपब्लिकनांच्या कोणत्याही गटाचा कार्यक्रम राजा हजर असे. यामुळेच प्रत्येक कार्यकर्त्यांच्या खिशात असलेल्या डायरीतील "राजा द्रोणकर यांचा नंबर हमखास मिळतो. चळवळीतील अजातशत्रूच. राजकारणात "व्यापार' शिरला आणि खरा कार्यकर्ता वेठबिगारी बनला ही खंत त्यांना नेहमीच सलत होती. उत्तर नागपुरातील मनोरमा हत्याकांड असो, खैरलांजी हत्याकांड, नामांतराचे आंदोलन, रमाबाईनगरचा गोळीबार या साऱ्या आंदोलनात चळवळीतील निखाऱ्यांना जपणारा हा सच्चा मित्र होता. दीक्षाभूमीवर येणाऱ्या बांधवांसाठी "संकल्प' या स्टॉलवरून भोजनदान सेवेसाठी ते अहोरात्र काम करीत होते.

बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष असताना गल्लीतील कार्यकर्त्यांना काम करण्याचा परवाना मिळवून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. यामुळेच गुरुवारी त्यांच्या निधनानंतर उत्तर नागपुरात वैशाली घाटावर अंत्यसंस्कारसमयी चाहत्यांची महायात्रा असल्याचा अनुभव येथे आला. राजकीय, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री रणजित देशमुख, आमदार नितीन राऊत, राजाभाऊ करवाडे, जयप्रकाश गुप्ता, प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, कवी इ. मो. नारनवरे, हरिदास टेंभूर्णे, माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, अशोक मेंढे, नरेश वहाणे, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, जयंत टेंभूरकर, दिनेश गोडघाटे, यांच्यासह हजारोच्या संख्येने मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajtshatru's exit in the movement