पाणी घरात जाणार नाही, याची काळजी घ्या! : केंद्रीय मंत्री गडकरी

धरमपेठ ः वनामतीमध्ये विविध प्रकल्प आढावा बैठकीत अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
धरमपेठ ः वनामतीमध्ये विविध प्रकल्प आढावा बैठकीत अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

नागपूरर : शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टीका करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामाच्या संथ गतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज वनामती येथे शहरातील विविध विकासकामे, प्रस्तावित प्रकल्प, प्रगतिपथावरील प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, मनपा आयुक्त अभिजित बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, नासुप्र सभापती शीतल उगले, राष्ट्रीय महामार्ग, नासुप्र, मनपा, मेट्रो, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरातील सिमेंट रस्ते उंच झाले असून त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याने ते लोकप्रतिनिधींच्या घरावर चालून येत असल्याकडे आमदार सुधाकर देशमुख यांनी लक्ष वेधले. रस्ते उंच केलेच; परंतु पावसाळी नाल्या तयार केल्या नाही. ज्या केल्या त्या सदोष असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर गडकरी यांनी पावसाळ्यात कुणाच्याही घरात पाणी शिरू नये, याबाबत कुठलीही दिरंगाई होता कामा नये, अशी तंबी गडकरींनी दिली. सिमेंट रस्ते चौकांपर्यंत तयार केले, त्यामुळे चौकांमध्ये खोलगट भाग तयार झाला. यावरही गडकरींनी नाराजी व्यक्त करीत सिमेंट रोडचे आराखडे सदोष तयार करण्यात आल्याची खंत व्यक्त केली. शहरातील स्टॉर्म ड्रेन नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवीत गडकरींनी त्या नाल्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.
"साई'च्या जागेवरील अतिक्रमण कारवाई सुरू
"साई' या क्रीडा संकुलासाठी 100 एकर जागेची मोजणी करण्यात आल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. या जमिनीवर अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली असून ही जागा "साई'ला देता येईल, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात साईच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश गडकरींनी दिले. गडकरींनी यावेळी नवीन यशवंत स्टेडियम तयार करण्याबाबतही आढावा घेतला. या कामाची जबाबदारी मेट्रोकडे देण्यात आली.
काम न करणाऱ्यांना निवृत्त करा!
काम न करणाऱ्यांना निवृत्त करा, अशा शब्दात गडकरींनी महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. नरेंद्रनगरातील टीएनजी उद्यानात सांडपाणी प्रक्रिया करणारे संयंत्र लावून तीन वर्षांपासून ते सुरू न केल्याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत मोहम्मद इजराईल तसेच उद्यान अधीक्षकांना सुनावले. यावेळी उद्यानांमध्ये 15 ऑगस्टपर्यंत ग्रीन जिम लावण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com