अरे हे काय? गावबंदीसाठी लावलेल्या बैलगाडीवरच चढवला ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

खामगाव तालुक्यातील जळंब येथील पोलिस कर्मचाऱ्याला चिरडण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता.30) तालुक्यातील तामशी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने गावबंदीसाठी प्रवेश द्वारावर लावण्यात आलेल्या बैलगाडीला उडवून देत वाळूसह पोबारा केल्याची घटना पुढे आली आहे

बाळापूर (जि. अकोला) : खामगाव तालुक्यातील जळंब येथील पोलिस कर्मचाऱ्याला चिरडण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता.30) तालुक्यातील तामशी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने गावबंदीसाठी प्रवेश द्वारावर लावण्यात आलेल्या बैलगाडीला उडवून देत वाळूसह पोबारा केल्याची घटना पुढे आली आहे. बाळापूर पोलिसांनी सदर गावात जावून प्रकरणाची चौकशी केली असता, ट्रॅक्टर आणि माल मिळून न आल्याने गंभीर गुन्हाची नोंद होऊ शकली नाही मात्र, अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- जिल्हाधिकारी म्हणाले नावालाच उघडतात दवाखाने

सुदैवाने जिवीत हानी टळली
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींकडून गावबंदी केली आहे. त्या अनुषंगाने तामशी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने गावात येणारे सर्वच रस्ते बैलगाडी, खुर्च्या लावून बंद केले आहेत. यादरम्यान बुधवारी (ता.29) रात्री आठ वाजताच्या दरम्यान सरपंच पती, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी प्रवेशद्वारा जवळ उभे असताना गावातील एका व्यक्तिने वाळूने भरलेला भरधाव ट्रॅक्टर सरळ बैलगाडी व उपस्थितांच्या अंगावर घातला. यातून समयसूचकता बाळगल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ट्रॅक्टरची जोरदार धडक बसल्याने बैलगाडी दुरवर फरफटत गेली. त्यानंतर गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडून बाळापूर तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी व पोलिसांना माहिती दिली.

क्लिक करा- हे काय? साखरेच्या गाडीत चक्क गुटखा, तंबाखू, बिडी आणि सिगारेट

ठाणेदारांकडून शिवीगाळ केल्याचा आरोप
या घटनेची माहिती सरपंचपती विजय पातोडे यांनी प्रथम बिट जमादार खिल्लारे यांना दिली. मात्र त्यांनी गस्तीवर असल्याचे सांगितले. त्यानंतर ठाणेदार नितीन शिंदे यांना सरपंचपतींनी फोन लावला असता ठाणेदारांनी हरामखोरा तू कोणा-कोणाला फोन लावतोस, असे म्हणून शिविगाळ केल्याचा आरोप सरपंचपतीं यांनी केला

ठाणेदार शिंदेंवर कारवाई करण्याची वंचितची मागणी
बाळापूर ठाणेदार यांनी तामशी सरपंचपती यांना दिलेली वागणूक निषेधार्ह असून वाळू माफियांला पाठीशी घालणारी आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जावून देखील बाळापूर पोलिस कारवाई करीत नसतील आणि उलट जनप्रतिनिधी व इतरांना कॉल करून माहिती दिली म्हणून शिवीगाळ करीत असतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे ठाणेदार शिंदे विरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना ईमेल व्दारे केली आहे.

शिवागीळ केली नाही
वाळू प्रकरणी अदखल पात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी गावात जावून चौकशी केली. ट्रॅक्टर आणि माल मिळाला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्‍नच नाही. शिवीगाळ करणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तत्थ नाही. मी कुणालाही शिवागळ केलीच नाही.
-नितिन शिंदे, ठाणेदार, बाळापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola excesses of the sand mafia