दुहेरी खुनाने हादरले अकोला

file photo
file photo

जुने शहरात सशस्त्र हाणामारीत एक ठार; केशवनगर रिंगरोडवर चाकू हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू

अकोलाः नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यंत्रणा गुंतली असताना २४ तासात झालेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने अकोला शहर हादरले. जुने शहरात जागेच्या वादावरून झालेल्या सशस्त्र हाणामारीत एक ठार झाला तर दोन्ही गटातील चौघे जखमी झाले. या घटनेतील आरोपींची धरपकड होत नाही तोच, कौलखेड रिंगरोडवर गुरुवारी सायंकाळी झालेल्या चाकू हल्ल्यात एक युवक ठार झाला.

एकाचा खून, आरोपींना पोलिस कोठडी
भूखंडावरील कुंपणाचा लाकडी खांब जाळल्याच्या कारणावरून बुधवारी (ता. १३) रात्री उशीरा जुने शहरातील बाळापूर नाका परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये शैलेश अढाऊ (रा. भारती प्लॉट) नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी न्यायालयाने यातील ३०२ च्या आरोपींना चार दिवसांची, तर ३०७ च्या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर नाका परिसरातील मारोती नगरात अग्रवाल नामक व्यक्तिची साडेचार एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी लाकडी खांबाचे कुंपण केले आहे. बुधवारी रात्री कुंपणातील लाकडी खांब जाळल्याच्या कारणावरून नागलकर गट आणि राहुल खडसान, अश्विन नवले, आशिष वानखडे, मंगेश टापरे, सागर पुरणे, किशोर वानखडे आणि शैलेश अढाऊ या दोन गटात वाद झाला. दोन्ही गटात सशस्त्र हाणामारीत शैलेश अढाऊ याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे सोबती अश्विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान हे तिघे जखमी झाले. नागलकर गटात तुषार नागलकर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशीरा घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. यावेळी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सांगर, शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक कैलास नागरे, यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी दोन्ही गटाने एकमेकांविरूद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. त्या नुसार नागलकर गटाविरूद्ध कलम ३०२ चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन्ही गटातील आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३२४, ५०४, १४३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री अक्षय नागलकर, अमर भगत, अमाेल नागलकर, सोनू धानेवार, विनायक नागलकर या पाच जणांना अटक केल्याची माहिती जुनेशहर पोलिसांनी दिली. या प्रकरणात १३ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आराेपी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार गजानन पडघाण यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी झाला होता वाद
नागलकर कुटुंबाकडे मंगळवारील (ता. १२) लग्न संमारंभ होते. लग्न समारंभातही या दोन गटात वाद झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, हा वाद दोन्ही गटाने मिटवला होता. दुसऱ्याच दिवशी रात्री दोन्ही गटात सशस्त्र हाणामारी झाली.

जागेच्या वादाची चर्चा
परिसरात अग्रवाल नामक व्यक्तिची साडेचार एकर जमीन असून, त्यावर अतिक्रमण होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने काही दिवसांपूर्वी येथील अतिक्रमण काढले होते. त्यानंतर अग्रवालने त्यावर फेन्सींग करून जागा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या जागेवर हक्क गाजविण्याचा वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातूनच ही घटना घडल्याची चर्चा गुरुवारी बाळापूर नाका परिसरात सुरू होती.

२४ तासात दुसरा खून
निंघोट यांच्यावर गुरुवारी (ता.१४) रात्री केशवनगर परिसरात चार ते पाच जणांनी चाकूने भोकसून हत्या केली. २४ तासातील हा दुसरा खून आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीम कायदा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत निंघोट हे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या घरात असताना त्यांना फोन आला. त्यामुळे ते घराबाहेर आले. घरापासून काही अंतरावर केशवनगरातील रिंगरोड परिसरात आल्यावर चार ते पाच जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी निंघोट यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केला व तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे सहकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत निंघोट हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत होते. यापूर्वी ते जुने शहरातील भीमनगर भागात राहत होते. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर भीमनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा सर्वापारमध्ये धावून आले. दरम्यान आरोपींमध्ये प्रेम, आकाश आणि आशु ही नावं समोर आली असून, पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला. २४ तासातील हा दुसरा खून असून, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जुन्या वादातून घडला प्रकार
प्रशांत निंघोट यांच्यावर जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, त्याचे नेमके कारण काय? याचे कारण अद्यापही समोर आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com