अकोलाः जिल्हाधिकारी निवासासमोर शेतकऱ्यांची ‘काळी दिवाळी’

Black Diwali
Black Diwali

अकोलाः शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी निवासासमोर गुरुवारी (ता. १९) सकाळी उपोषण करून काळी दिवाळी साजरी केली. परवानगीशिवाय आंदोलन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी ३२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. 

जिल्ह्यातील २२ हजाराहून अधिक पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ‘सोयाबीन बोनस’चे सात कोटी रुपये देण्यात यावे, कीटकनाशक बळीची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांना मंगळवारी (ता.१७) निवेदन दिले होते. कीटकनाशक बळी प्रकरणी मदतीसाठी जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे तसेच शेतकऱ्यांना रखडलेले बोनस न मिळाल्यास, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे निवासगृहासमोर उपोषण करून ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचे नमुद केले होते. त्यानुसार गुरूवारी सकाळी ९.३० वाजता शेतकरी जागर मंचच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासगृहासमोर काळे कंदील, काळे कपडे परिधान करीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणाबाजी करीत निषेध केला. याचवेळी सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

परवानगी शिवाय आंदोलन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उलंघन केल्याच्या आरोपाखाली ३२ कार्यकर्त्यांवर सिव्हील लाईन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. या उपोषणात मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, काशीराम साबळे, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, सचिन लाखे, अरविंद पांडे, सुभाष आवळे, सतिश देशमुख, श्रीकांत पिसे, गजानन वारकरी, शेख अन्सारी, सय्यद वाजिद, शिवाजीराव मसने, वसंतराव उजाळे, राजू गवई, सुरेश अमलकर, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, रंगराव टेके, लालू काजी, दिलीप मोहोड आदींची उपस्थिती होती. 


आम्ही शांततापूर्वक उपोषण करणार होतो. त्याबाबत परवानगीसुद्धा घेतली होती. परंतु, उपोषण ठिकाणी मंडप टाकू देण्यात आला नाही. एकत्र आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना धरपकड करून उपोषण हाणून पाडण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, प्रशासनाकडे लोकशाही मार्गाने मागणीचे निवेदन देण्याचा आमचा मानस होता. परंतु, सर्व कार्यकर्त्यांना अटक करून, पाच तास पोलिस ठाण्यामध्ये थांबविण्यात आले. 
- मनोज तायडे, शेतकरी जागर मंच कार्यकर्ते 

फसवी कर्जमाफी, सोयाबीन बोनस देण्यास टाळाटाळ, शेतमालाचे भाव हमीभावापेक्षाही कमी, कीटकनाशक बळी प्रकरणी जिल्हा मदतीसाठी वंचित इत्यादी बाबींमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारमय झाली आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून, परवाणगीसह शेतकरी जागरमंचच्या वतीने उपोषण करण्यात येत होते. परंतु, येथेही कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करून न्याय मागणीचा आवाज दाबण्यात आला. 
- प्रशांत गावंडे, शेतकरी जागर मंच कार्यकर्ते  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com