आता राज्यात, जन्म, शूभमंगल, माहेरची झाडी वृक्ष योजना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

जुलैपासून अंमलबजावणी
वृक्ष लागवड आणि संगोपणासाठी ता. १ जुलै रोजी ही योजना राबविली जाईल. तेव्हापासून निरंतर ही योजना राबविण्यासाठी नागरिकांना रोप पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेनुसार रोप तयार करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, उद्योजक, दानशूर व प्रतिष्ठीत नागरिकांकडून देणगी रुपाने व विविध कंपन्यांकडून सामाजिक बांधिलकी अंतर्गत निधी घेवून रोपवाटिका तयार करण्याबाबतची सूचना राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना दिली आहे.

अकोला : प्रत्येक कुटुंबात आनंदाचा क्षण येतो, तसा दुःखाचाही प्रसंगही आेढवतो. अशावेळी कुटुंबात येणाऱ्या नवीन पाहुण्याचे स्वागत असाे वा प्रिय व्यक्ती जग सोडून गेले म्हणून त्याच्या स्मृतीत एक वृक्ष लावून त्याचे संगोपण करण्यासाठी राज्य शासनाने महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ ही योजना सन २०१८ या वर्षात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय वनधोरणानुसार देशात्या एकूण भाैगोलिक क्षेत्राच्या ३३ क्षेत्रावर वनक्षेत्र असणे अत्यावश्‍यक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २० टक्क्यांच्या जवळापास आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हवामात झालेल्या बदलाने दुष्काळ किंवा अतिवृष्टी यासारख्या टोकाच्या नैसर्गिक आपत्ती आेढवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून वृक्ष लागवड करणे आणि त्याचे संगोपण करण्याचा भरीव कार्यक्रम जागतिक स्तरावर सर्व देशांनी राबविण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राज्य सरकार राबवित आहे. विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमात वृक्ष संगोपणाची येणारी अडचण लक्षात घेता आता राज्यातील नागरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी राज्यातील २७ महापालिकांना, १८ ‘अ’ वर्ग नगरपालिका, ७३ ‘ब’ वर्ग नगरपालिका आणि २६७ नगरपालिकांना वार्डनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून मनपा क्षेत्रात १६ लाख २० हजार, ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात एक लाख ८० हजार, ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात दोन लाख ९२ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रात एका प्रभागात २४०० वृक्ष लावडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.        

‘रानमळा’चा आदर्श
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या रानमळा ग्रामपंचायतीने ग्रामस्थांकडून जन्म, विवाह, मृत्यू आदी प्रसंगी लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी मोकळ्या जागेत, परस बागेत, शेताच्या बांधावर वृक्ष लागवड केली जाते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या उपक्रमातून आदर्श घेत राज्य शासनाने संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

काय आहे योजना?
जन्म वृक्ष : कुटुंबात जन्माला येणाऱ्याचे स्वागत वृक्ष लावून करणे. 

शुभमंगल वृक्ष, माहेरची झाडी : विवाह प्रसंगी वृक्ष भेट देणे, विवाह होऊन सासरी गेलेल्या मुलीच्या माहेरी वृक्ष भेट देवून मुलीची आठवण म्हणून वृक्ष संगोपण करणे. 

आनंद वृक्ष : दहावी, बारावी किंवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे, निवडून येणे अशा आनंदाच्या प्रसंगाची आठवण म्हणूण वृक्ष लावणे. 

स्मृती वृक्ष : कुटुंबातील दुःखाच्या प्रसंगात निधन झालेल्या व्यक्तीच्या स्मृतीत श्रद्धांजली प्रसंगी रोप भेट देवून त्याचे संगोपण करणे. 

जुलैपासून अंमलबजावणी
वृक्ष लागवड आणि संगोपणासाठी ता. १ जुलै रोजी ही योजना राबविली जाईल. तेव्हापासून निरंतर ही योजना राबविण्यासाठी नागरिकांना रोप पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेनुसार रोप तयार करण्यासाठी पर्यावरण प्रेमी, उद्योजक, दानशूर व प्रतिष्ठीत नागरिकांकडून देणगी रुपाने व विविध कंपन्यांकडून सामाजिक बांधिलकी अंतर्गत निधी घेवून रोपवाटिका तयार करण्याबाबतची सूचना राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना दिली आहे.

Web Title: Akola news government schemes