गावांच्या प्रगतीतच देशाची प्रगती - भटकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

अकोला - 'नवतंत्रज्ञान, संशोधन, कौशल्यपूर्ण माहिती, गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांची नाळ गावांशी जुळली, तर विकास साधणे सहज शक्‍य होईल. देशात सहा लाख 40 हजार खेडी असून, (अडुसष्ट) टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीचा मार्ग हा गावांच्या प्रगतीमधून आहे हे जाणून त्यानुसार कार्य करणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी सोमवारी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (बत्तिसाव्या) व्या दीक्षान्त समारंभात विशेष पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुडंकर, माजी मुख्य सचिव (कृषी) उमेशचंद्र सारंगी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आदी उपस्थित होते. डॉ. भटकर म्हणाले, 'भारतातील कृषी-ऋषी संस्कृती जगातील सर्वांत जुन्या ज्ञानावर आधारित आहे. जगातील पहिले विश्वविद्यालय नालंदा येथे होते. त्यामुळे भारताला वैदिक काळात वैभव प्राप्त झाले होते; परंतु कालांतराने यामध्ये बदल झाला. भारताला उन्नत राष्ट्र बनवून प्रत्येक महाविद्यालयाने ग्रामपंचायती दत्तक घेऊन तिथे संशोधन आणि नवीन उपक्रमांसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.''

Web Title: akola news vidarbha news village development india develop dr vijay bhatkar