प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; दुसऱ्या दिवशी बाळही दगावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

डॉक्टरांची अनुपस्थिती 
प्राप्त माहितीनुसार, महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले हाेते. परंतु, गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने बहुतांश डाॅक्टर रुग्णालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर हाेऊन, तिचा मृत्यू झाल्याचा आराेप महिलेच्या नातेवाईकांनी केला. 

अकाेलाः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्हा स्त्री रुग्णालयात एका २३ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला, तर दुसऱ्याच दिवशी जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.२०) समाेर आला. या प्रकाराला जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी पाेलिसांत केली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव माणेगाव (ता.जळगाव जामाेद) येथील साेनू भीमराव आगरकर (२३) यांना प्रसूतीसाठी गुरुवारी दाखल करण्यात आले हाेते. रात्री ९.१० वाजताच्या सुमारास महिलेने मुलीला जन्म दिला. वजन कमी असल्याने बाळाला एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आले हाेते. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाविरोधात राेष व्यक्त केला. प्रसूतीवेळी डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने महिलेचा मृत्यू झाला असून, याला जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी अकाेटफैल पाेलिस ठाण्यात दिली. मातेच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता.२०) सकाळी बाळही दगावले. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कधी नवजात बालकाच्या अंगाला मुंग्या लागणे, तर कधी प्रसूतीवेळीच मातांचा मृत्यू हाेणे, असे प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात घडले आहेत. याला प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 

डॉक्टरांची अनुपस्थिती 
प्राप्त माहितीनुसार, महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले हाेते. परंतु, गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने बहुतांश डाॅक्टर रुग्णालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर हाेऊन, तिचा मृत्यू झाल्याचा आराेप महिलेच्या नातेवाईकांनी केला. 

स्त्री रुग्णालय म्हणे, प्रकृती गंभीरच 
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मते, महिलेला रुग्णालयात दाखल केले हाेते तेव्हा महिलेची प्रकृती गंभीर हाेती. प्रसूतीनंतर तब्येत आणखी खालावल्याने महिलेला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात हलविण्यात आले. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आले हाेते. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी राेष व्यक्त केला हाेता. परंतु, त्यांची समजूत काढल्यावर ते शांत झाल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली. 

Web Title: Akola news women dead after delivery