esakal | बुलडाण्यातील पॉझिटीव्ह रुग्णांमुळे आता अकोल्यातही खबरदारीची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Akola residents now need caution due to positive patients in Buldana

आतापर्यंत जिल्ह्यातील २८ जणांचे वैद्यकीय चाचणी नमुने निगेटीव्ह आले आहेत. राज्यातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत अकोल्यात एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने अकोलेकरांसाठी हे वृत्त दिलासा देणारी आहे. परंतु, दररोज दाखल होणाऱ्या कोरोनाच्या संशयित रुग्णांमुळे चिंता अजूनही कायम आहे.

बुलडाण्यातील पॉझिटीव्ह रुग्णांमुळे आता अकोल्यातही खबरदारीची गरज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात शनिवारी (ता.२८) रात्री कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण दाखल झाले. हे दोन्ही संशयित रुग्ण मूर्तिजापूर येथील रहिवासी असून, त्यांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. तर अतिदक्षता कक्षात दाखल एकाचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र, बुलडाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने ‘सोशल डिस्टंसिंग’ राखण्याची गरज निर्माण झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील २८ जणांचे वैद्यकीय चाचणी नमुने निगेटीव्ह आले आहेत. राज्यातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत अकोल्यात एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने अकोलेकरांसाठी हे वृत्त दिलासा देणारी आहे. परंतु, दररोज दाखल होणाऱ्या कोरोनाच्या संशयित रुग्णांमुळे चिंता अजूनही कायम आहे. अशातच शनिवारी रात्री बुलडाणा जिल्ह्यातील एका रुग्णाचा आयसोलेशन कक्षात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, रविवारी त्या रुग्णाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आली. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग राखण्याची गरज निर्माण झाली आहे.

आतातरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखा
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या हजारावर पोहोचली असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. सध्यातरी अकोल्यात कोरोनाचा एकही बाधित नसला, तरी बुलडाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. परंतु, अनेकांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: ‘होम क्वारंटीन’मध्ये असलेल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. अद्यापही अनेक जण कारण नसताना रस्त्यावर फिरत असून, गर्दी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

डॉक्टरही धास्तावले
बुलडाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याने येथील सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही धास्ती भरली आहे. त्यामुळे डॉक्टरही विशेष खबर दारी घेत आहेत. विशेषत: विदेशातून येणाऱ्या किंवा इतर महानगरातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करताना त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

loading image