

Akola Shivsena Political Situation
अकोला : शिवसेनेत फूट पडल्यानंतर अकोला जिल्ह्यातही शिंदे सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली. सुरुवातीला पक्षप्रवेशांच्या माध्यमातून शिंदे सेनेने जिल्ह्यात आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षात मोठ्या नेत्यांचा सहभाग असूनही संघटनात्मक बांधणीला अपेक्षित गती मिळालेली नाही. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त होण्यापासून युवा सेना आणि युवती सेनेच्या निष्क्रियतेपर्यंत अनेक प्रश्न समोर आले आहेत. दुसरीकडे, महापालिकेतील नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे ठाकरे सेनेचे संख्याबळ घटले असले, तरी आमदार नितीन देशमुख यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविल्याने पक्षाची जनहिताच्या मुद्द्यांवरील सक्रियता कायम आहे. त्यामुळे अकोल्यातील राजकीय परिस्थितीत शिंदे सेनेसमोर संघटनात्मक आव्हाने, तर ठाकरे सेनेसमोर पक्षाची पुनर्बांधणी असे चित्र आहे.