टाळेबंदीच्या दुष्टचक्रात बळीराजाने दाखवली ‘हिम्मत’!, शेतकरी आत्महत्या घटल्या 

सुगत खाडे  
सोमवार, 25 मे 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी देशभर साठ दिवसांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. असे असले तरी मानसिक ताण-तणावाच्या या काळात खचून न जाता बळीराजाने आत्महत्येचा मार्ग सोडल्याचे दिसून येत आहे. परिणामी महिन्याला सरासरी दहा-बारा शेतकरी आत्महत्यांचा आकडा टाळेबंदीत कमी होऊन चार-पाच वर पोहोचला आहे. त्यामुळे संकटाच्या काळात हिम्मतीने जगण्याचे उदाहरण बळीराजाने सर्वांसमोर निर्माण केले.

अकोला  : कोरोना विषाणू संसर्गाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी देशभर साठ दिवसांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. असे असले तरी मानसिक ताण-तणावाच्या या काळात खचून न जाता बळीराजाने आत्महत्येचा मार्ग सोडल्याचे दिसून येत आहे. परिणामी महिन्याला सरासरी दहा-बारा शेतकरी आत्महत्यांचा आकडा टाळेबंदीत कमी होऊन चार-पाच वर पोहोचला आहे. त्यामुळे संकटाच्या काळात हिम्मतीने जगण्याचे उदाहरण बळीराजाने सर्वांसमोर निर्माण केले.

शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे खर्चाला न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवत असल्याचे चित्र जिल्ह्यात नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे सुद्धा दिसून येते. परिणामी साधारण स्थितीत दर दोन-तीन दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. शेतकऱ्यांच्या या दयनीय अवस्थेमुळे २०१५ मध्ये जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा २०० वर जाऊन पोहोचला होता. त्यानंतरच्या वर्षांत सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दीडशेच्या खाली पाहायला मिळाले नाही.

गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस व शेतमालाचे उत्पादन चांगले होत असल्यानंतर सुद्धा दर तीन दिवसाआड एक शेतकरी आत्महत्येची घटना घडली. असे असले तरी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 23 मार्च पासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण निम्म्यापेक्षाही खाली आल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात महिन्यात सरासरी दहा ते बारा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी टाळेबंदीत घरातच राहून आत्महत्येचा मार्ग न निवडतात इतरांसमोर संकटाच्या काळाला धैर्याने सामोरे जाण्याचे उदाहरण निर्माण केले आहे.

कर्जमाफीनंतर ही स्थिती होती ‘जैसे थे’च
शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यातील भाजप सरकारने मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवून लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत चालल्या होत्या. परंतु टाळेबंदीत या घटनांवर ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.

असे घडले आत्महत्येचे प्रमाण
मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली. या महिन्यात जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी आहे. एप्रिल महिन्यात व मे महिन्यात प्रत्येकी पाच-पाच शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडण्याचे सरकारी आकडे सांगतात. मार्च महिन्यात अकोट तालुक्यात दोन, तेल्हारा व पातूर मध्ये प्रत्येकी १-१. एप्रिल महिन्यात पातुर तालुक्यात तीन, अकोला व मुर्तीजापुरमध्ये प्रत्येकी १-१ व मे महिन्यात बाळापुर तालुक्यात तीन व अकोला तालुक्यात २ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola In the vicious cycle of lockout, Baliraja showed 'courage' !, farmer suicides decreased