कॉंग्रेसची मग्रुरी अजूनही संपली नाही - डॉ. प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

अकोला - 'कॉंग्रेस पक्षाची मग्रुरी अजूनही संपलेली नाही. त्यामुळे गुजरातमधील निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील. हार्दिक पटेल व अल्पेश ठाकूर यांना सोबत घेत कॉंग्रेस एकाच म्यानामध्ये दोन तलवारी ठेवण्याचा प्रयत्न करतेय. पण एका म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विरोधात असणाऱ्या पक्ष, संघटनांशी कॉंग्रेसने अजूनही संवाद साधला नाही. त्यामुळे ते स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत,'' असे मत भारिप-बहुजन महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

येथील शासकीय विश्रामगृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. आंबेडकर म्हणाले, 'गुजरात भाजपची थेट लढत देण्यास कॉंग्रेस सक्षम ठरल्याचे दिसत नाही. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले नाहीत. हार्दिक पटेल व अल्पेश ठाकूर यांना सोबत घेतले. पण एका म्यानात दोन तलवारी बसत नसतात.''

'भाजपची रणनीती लक्षात घेता कॉंग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला विरोध करणाऱ्या इतर पक्ष, संघटनांशी संवाद साधत निवडणुकीला सामोरे जाणे आवश्‍यक होते. मात्र, तसा संवाद साधला गेला नाही. गुजरातमधील सामाजिक समीकरण पाहता स्थानिक पातळीवर जे या समाजासाठी योग्य ठरेल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. गुजरातमध्ये पुन्हा भाजपचा विजय झाल्यास तो कॉंग्रेसच्या नाकर्तेपणाचाच परिणाम असेल,'' अशी खरमरीत टीका त्यांनी कॉंग्रेसवर केली.

Web Title: akola vidarbha news dr. prakash ambedkar comment on congress