मराठवाडा, विदर्भाला गारपिटीचा तडाखा

Hailstorm
Hailstorm

अवकाळी पावसानेही झोपडले; रब्बी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संकटात
  अकोला/औरंगाबाद - नैसर्गिक संकटांशी सातत्याने दोन हात करत आलेल्या मराठवाड्यासह विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागाला आज गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी, अनेक ठिकाणी पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुसान झाले आहे. खरीप हंगामात मिळालेल्या अत्यल्प उत्पादनामुळे रब्बी पिकांवर मदार असताना निसर्गाने पुन्हा अवकृपा दाखविल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. खानदेशातील जळगाव, धुळे, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, भंडारा जिल्ह्यांतील काही भागांत आज सकाळी गारांसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे मृग बहरात आलेला आंबा, मोसंबी, केळी, संत्रा, द्राक्षे तसेच रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतशिवारात गारांचा खच पडल्याने ऐन काढणी हंगामात रब्बी पिकांवर अवकाळी पावसामुळे संक्रात आल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
  विदर्भात अकोला जिल्ह्यातील अकोट, पातूर, बाळापूर तेल्हारा, बार्शी टाकळी तालुक्‍यात, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, चिखली, मोताळा, संग्रामपूर, खामगाव, नांदुरा तालुक्‍याला आणि वाशीम जिल्ह्यात मालेगाव व रिसोड तालुक्‍याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. गारपिटीनंतर बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतील काही गावांत झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू झाले आहेत.

यात बीड, जालना, परभणी आणि हिंगोलीत गारपीट झाली. बीड जिल्ह्यात बीड तालुक्‍यासह गेवराई, शिरूर व माजलगाव तालुक्‍यात, जालना जिल्ह्यात जालना, अंबड, जाफराबाद, घनसावंगी व परतूर या तालुक्‍यांना गारपीटीचा तडाखा बसला.

बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनानेही पंचनामे सुरू केले असून दोन दिवसांत अंतिम अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
 
  चार जणांचा मृत्यू
  गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात चार जणांचे बळी गेले. वंजार उम्रद (ता. जालना) येथे शेतावर निघालेले शेतमजूर नामदेव शिंदे (वय 65) यांचा गारांचा मार लागून मृत्यू झाला. तर, निवडुंगा (ता. जाफराबाद) येथील आसाराम गणपत जगताप (वय 60) यांचाही गारांच्या तडाख्यात सापडल्याने मृत्यू झाला आहे. विदर्भात वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्‍यातील महागाव येथे यमुनाबाई रामभाऊ हुंबाड (वय 72) यांचा डोक्‍याला गारांचा जोरदार तडाखा बसल्याने मृत्यू झाला, तर बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्‍यातील गिरोली येथे कापूस वेचणीसाठी गेलेल्या निकिता गणेश राठोड (वय 16) या मुलीचा मृत्यू झाला असून, तिची लहान बहीण नेहा गणेश राठोड (वय 13) ही गंभीर जखमी झाली.
 
  या पिकांना फटका -
  गहू, हरभरा, कांदा बियाणे, मका, भाजीपाला, लिंबू, केळी, संत्रा, आंबा, डाळिंब, पपई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com