स्वत:ला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून भ्रष्ट मंत्री पाठीशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

अकोला - जनतेला "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमधील अनेक मंत्र्यांचे गैरव्यवहार बाहेर आले आहेत. मात्र, स्वत:ला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (ता. 24) केला. मंत्री प्रकाश महेता, सनदी अधिकारी मोपलवार यांना हटवून त्यांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

एका खसागी कार्यक्रमासाठी आले असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ""या सरकारच्या काळात सर्वसामान्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या जाचक अटी लादून सरकार जनतेची पिळवणूक करीत आहे. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे गैरव्यवहार बाहेर आले; पण स्वत:ला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. जमिनीच्या प्रकरणात मंत्री महेता मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असताना त्यांना काढले जात नाही. याचा अर्थ महेतांच्या नियमबाह्य कामांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन असल्याचे स्पष्ट होते. मोपलवार प्रकरणात तर भाजपच्याच आमदारांनी पुरावे देऊनही भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालण्यात आले. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यांचे पक्षातंर्गत प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी न्यायालयीन चौकशी करीत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले,'' असे चव्हाण म्हणाले.
या वेळी कॉंग्रेस नेते माजी मंत्री अजहर हुसेन तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: akola vidarbha news prithviraj chavan talking