राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी चेहरा द्या!  - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

अकोला - देशातील उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रपतीपदाकरिता आदिवासी चेहरा देण्याची मागणी भारिप-बहुजन महासंघांचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी अकोला येथे केली. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावर टिका करताना राष्ट्रपदी निवडणूक होत असताना राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी पेटलेले आंदोलन परवडणारे नाही, हे हेरूनच भाजप सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असल्याचे सांगितले.

शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच होत असून, राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी पेटलेले आंदोलन या निवडणुकीच्या दरम्यान परवडणारे नाही, म्हणूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविण्यात आले आहे. मात्र, सरकारची ही कर्जमाफीची घोषणा फोकणाड आहे. सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. राज्यात तीस लाख शेतकरी असून, त्यांना बॅंका व सहकारी संस्था पैसा देतील असे सरकार म्हणते. मात्र, बॅंक, सहकारी संस्था सरकारला हमी मागत असून, सरकारी तिजोरीत पैसा नाही. वेगवेगळ्या वित्त पुरवठा कंपन्यांकडे मदत मागितली असून, त्यांनी ती नाकारली आहे. अशा परिस्थिती शासन शेतकऱ्यांना दहा हजार रुपये कसे देणार, हा मोठा प्रश्न आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नसोबतच त्यांनी देशातील आदिवासी समाज आजही उपेक्षितांचे जीवन जगत असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासोबतच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आदिवासी उमेदवार देण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षाच्या समितीसोबत सल्ला करताना ही सूनचाही आपण मांडल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मोहन भागवत आणि शरद पवार यांची नावे राष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहेत. त्याबाबत विचारल्यावर मोहन भागवत यांना एका पायावर पाठिंबा द्यायला तयार असल्याचे सांगत आंबेडकर यांनी फिरकी घेतली.

"जीएसटी'त महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान
सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या महाराष्ट्राचे जीएसटीत सर्वाधिक नुकसान होणार आहे. "जीएसटी'च्या अंमलबाजवणीसाठी सरकारकडे कोणतीह तयारी नसल्याने ही कर योजना अपयशी ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

"मुदतपूर्व' फायदा भाजपलाच
राज्यात सध्या मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा सुरू आहे. मात्र, भाजपकडून शिवसेनेला धाक दाखविण्यासाठीच "मुदतपूर्व'ची चर्चा सुरू करण्यात आल्याचे डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुदतपूर्व निवडणुका झाल्या तर त्याचा फायदा भाजपलाच अधिक होईल, असे भाकितही त्यांनी केले.

Web Title: akola vidarbha news tribal person for president post