esakal | लग्नसराईचा हंगामही हातचा गेला; लॉकडाऊनमुळे 50 कोटींचा फटका, कापड व्यावसायिकांची वाढली चिंता  
sakal

बोलून बातमी शोधा

akola washim buldana loss 50 crore business

रेडिमेड व कापड व्यवसायाला सुमारे 50 कोटींचा फटका बसणार असल्याचे संकेत आहेत. एकूणच वाशीमच्या कापड व्यवसायावरही निराशाजनक अशी छाया पसरली आहे.

लग्नसराईचा हंगामही हातचा गेला; लॉकडाऊनमुळे 50 कोटींचा फटका, कापड व्यावसायिकांची वाढली चिंता  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : सुमारे महिनाभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय डबघाईस झाले आहेत. पूर्ण सुरळीतता येईपर्यंत व्यवसाय पूर्वपदावर येणे कठीण आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसराईचे मुहूर्त हातचे निघून जात आहेत. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे यंदा लग्नसराईचा हंगाम पुढच्या वर्षावर लोटल्या आहे. या अनुषंगाने या हंगामातील मोठा मानला जाणारा लग्नाचा बस्ता खरेदी होणार नसल्याने, वाशीम जिल्ह्यातील रेडिमेड व कापड व्यवसायाला सुमारे 50 कोटींचा फटका बसणार असल्याचे संकेत आहेत. एकूणच वाशीमच्या कापड व्यवसायावरही निराशाजनक अशी छाया पसरली आहे.

कापड व्यवसायिकांनी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेऊन फेब्रुवारी महिन्यातच खरेदी करून या लग्नसराईसाठी बाजारपेठ सज्ज केली होती. परंतु, अचानकपणे आलेल्या कोरोना संकटामुळे सार्वजनिक व मोठ्या प्रमाणात होणारे लग्नसोहळे रद्द करण्यात आले आहेत. ऐन लग्नसराईच्या तोंडावर ता. 24 मार्चला पहिले लॉकडाऊन जाहीर झाले व आता येत्या ता. तीन मेपर्यंत हे लॉकडाऊन चालणार असल्याने लग्नाचा सारासार मौसमच हातचा जाणार असल्यामुळे कापड व्यावसायिक चिंतेत आहेत. मार्च ते मे या तीनच महिन्यात संपूर्ण वर्षाच्या 50 टक्के कापड मालाची विक्री होते. मात्र, आता एक महिन्याच्या विक्रीसाठी किमान तीन महिने लागणार आहेत. जर ता. तीन मे रोजी लॉकडाऊन उघडले तर दिवाळीचा व्यवसाय ठिक  राहू जाऊ शकेल, तसे न होता लॉकडाऊन पुढे ढकलल्यास संपूर्ण कापड व्यवसायाला मोठ्या मंदीला सामोरे जावे लागणार असल्याचे कापड व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, खामगाव, अमरावती सारख्या शहरातही हीच स्थिती असल्याने कापड व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे झाले आहे.

दरवर्षी बदलतो फॅशनचा ट्रेंड
दरवर्षी रेडीमेड गारमेंटमध्ये फॅशन ट्रेंड बदलत असतात आणि या वर्षाची घेतलेला माल पुढील वर्षाला विकला जात नाही. त्यामुळे याचा देखील दुहेरी फटका व्यापाऱ्यांना बसू शकतो. एक तर लॉकडाऊनमुळे कापड विकले गेले नाही. आणि दुसरे म्हणजे जेथून माल आणला त्या पुरवठादारांना पैसा द्यावाच लागणार आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येकाच्या दुकानांमध्ये कामगार आहेत, त्यांना तर घरातूनच पगार द्यावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत कापड व्यवसाय अडकला आहे. 

कोट्यवधींचा फटका
छोट्या व्यापाऱ्यांनी पाच ते 15 लाख तर मध्यम व्यापाऱ्यांनी 20 ते 40 लाख आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी दीड ते दोन कोटींचा माल लग्नसराईसाठी भरून ठेवला आहे. वाशीम शहरात रेडीमेड गारमेंट्सचे आठ ते दहा मोठे शोरूम आहेत. रेडिमेंटची 20 ते 30 दुकाने तर आहेराची जवळपास तितकीच दुकाने आहेत. एकंदरीत पैशांचे व्यवहार पूर्णपणे थांबल आहेत. पुरवठादारांना पैसे पाठवायचे आहेत, नोकरांना पगार द्यायचा आहे. अशा अनेक समस्या कापड व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत. उत्पन्न शून्य आणि खर्च लागू आहे. संपूर्ण भारतात रिटेल कापड व्यवसाय सहा कोटी जणांना रोजगार देत असून, यावर परिणाम झाल्यास 20 टक्के जणांना बेरोजगारीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

कापड व्यावसायिकांना मदतीचा हात
दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात कापडविक्रीचा 50 टक्के व्यवसाय होतो. मात्र, आता नेमकी आर्थिक वर्षाची सुरुवातच लॉकडाऊनने झाली असून, पुढचे चित्र अद्यापही स्पष्ट नाही. त्यामुळे किमान सकाळी आठ ते 12 दरम्यान आपली दालने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. हे सर्व सुरळीत झाल्यावर देखील ही तूट भरून निघेपर्यंत बराच कालावधी उलटून जाईल. तेव्हा सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन, कापड व्यावसायिकांना मदतीचा हात द्यावा.
-नंदकिशोर पाटील, पाटील अँड कंपनी, वाशीम

loading image